Manohar Joshi Passed Away | माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचे निधन

मुंबई : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Manohar Joshi Passed Away | देशाचे माजी लोकसभा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज पहाटे (२३ फेब्रुवारी) तीनच्या सुमारास निधन झाले. गुरुवारी रात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षाचे होते.(Manohar Joshi Passed Away)
आज शुक्रवारी दुपारनंतर दादर स्मशान भूमीत मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी २ नंतर अंत्ययात्रा सुरू होईल.
शिवसेनेच्या स्थापनेपासून मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होते. बाळासाहेबांचे अत्यंत निष्ठावंत, विश्वासू सहकारी म्हणून ते महाराष्ट्राला परिचित होते. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर पक्षाचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला.
वयोमानामुळे ते मागील काही वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर होते. त्यांचा जीवनप्रवास हा अतिशय प्रेरणादायी असा आहे. माधूकरी लावून आपले शिक्षण पूर्ण करणे ते देशाच्या लोकसभेचे सभापती, असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
सुरुवातीला माधूकरी लावून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. नंतर मुंबईतून येऊन शिकवणी वर्ग घेतले, त्यानंतर त्यांनी ‘कोहिनूर’ची स्थापना केली.
मनोहर जोशी यांची राजकीय वाटचाल…
- १९७६ ला ते शिवसेनेचे मुंबईचे महापौर झाले
- मार्च १९९० ते डिसेंबर ९१ विधानसभेचे विरोधी पक्षनेते
- मार्च १९९५ ते जानेवारी १९९९ या काळात राज्याचे मुख्यमंत्री.
- ऑक्टोबर ९९ ते मे २००२ केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री
- मे २००२ ते ऑगस्ट २००४ लोकसभेचे अध्यक्ष.