Rupali Chakankar | रूपाली चाकणकरांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करा, काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षांची मागणी

0

पुणे : Rupali Chakankar | राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (Ajit Pawar NCP) महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ज्या पद्धतीने ईव्हीएम मशीनची पूजा (EVM Machin Pooja) केली, त्यांचे अशा पद्धतीने वागणे हे वेड्यासारखे आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत, अशी बोचरी टीका काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे (Sandhya Sawalakhe) यांनी केली आहे.

राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra State Women’s Commission) अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी काल मतदानापूर्वी ईव्हीएम मशीनची पूजा केली होती. त्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीका होत आहे. तसेच हा थट्टेचा विषय देखील झाला आहे. यावरूनच काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी चाकणकर यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.

संध्या सव्वालाखे म्हणाल्या, गेल्यावेळी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या कार्यालयातून पक्षाचा प्रचार केला होता. तेव्हा त्यांची कीव आली होती. त्यावेळी असे वाटले होते की त्या असे कृत्य कुणाच्यातरी सांगण्यावरुन अथवा दडपणाखाली करत असतील. मात्र आजचे कृत्य म्हणजे खरंच त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे लक्षण आहे. तसेच हे पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारे आहे.

संध्या सव्वालाखे पुढे म्हणाल्या, भविष्यात आयोगाकडे एखादी महिला दाद मागण्यासाठी गेल्यास तिला न्याय मिळणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी रूपाली चाकणकर यांच्या कृत्याची तात्काळ दखल घेऊन त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी.

दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मतदानापूर्वी ईव्हीएम मशीनची पूजा केल्याने या प्रकरणाची दखल घेत निवडणूक अधिकाऱ्यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. ईव्हीएमची पूजा करतानाचा रूपाली चाकणकर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.