Rashmika Mandana-Atal Setu Bridge | अभिनेत्री रश्मिका मंधानाने केलं अटल सेतूचं कौतुक, काँग्रेसने दिली खोचक प्रतिक्रिया, आकडेवारीसह खोटा ठरवला दावा (Videos)

0

मुंबई : Rashmika Mandana-Atal Setu Bridge | प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंधाना हिने मुंबईतील अटल सेतूचे कौतुक करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे (Social Media). व्हिडिओत तिने हा सेतू तयार करणाऱ्या सरकारचे तोंडभरून कौतुक केले आहे. विशेष म्हणजे रश्मिकाची ही एक्सवरील पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही शेअर केली आहे. यावरून काँग्रेसने तिचा चांगलाच समाचार घेतला आहे. हा व्हिडीओ ईडीने दिग्दर्शिक केलेली जाहीरात आहे, असे केरळ काँग्रेसने म्हटले आहे.

रश्मिका मंधानाने शेअर केलेला हा व्हिडीओ निवडणुकीची जाहिरात वाटत आहे. त्यामुळे तिच्यावर टीका होत आहे. रश्मिकाने व्हिडिओत म्हटले आहे की, अटल सेतूमुळे दोन तासांचा प्रवास आता फक्त २० मिनिटांत होत आहे. देशातील हा सर्वात पहिला समुद्रावरील पूल आहे.

यानंतर केरळ काँग्रेसने (Kerala Congress) एक्सवर एक पोस्ट करून वांद्रे-वरळी सी लिंक (Bandra–Worli Sea Link) आणि अटल सेतूची तुलना करणारी आकडेवारी देत रश्मिकावर टीका केली आहे.

केरळ काँग्रेसने वांद्रे-वरळी सी लिंकवरील एक व्हिडीओही शेअर केला आहे. तसेच एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रिय रश्मिका मंधानाजी, देशाने या आधी पैसे देऊन केलेल्या छुप्या जाहिराती, खोट्या जाहिराती पाहिल्या आहेत. मात्र ईडीने दिग्दर्शित केलेली ही पहिलीच जाहिरात आहे. जाहिरात चांगली झाली आहे, अभिनंदन.

पण तुमच्या जाहिरातीमध्ये अटल सेतू पूर्ण रिकामा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आम्ही मुंबईतील काँग्रेस सहकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की, अटल सेतू पेक्षा राजीव गांधी वांद्रे – वरळी सी लिंकवर अधिक वाहतूक असते, असे केरळ काँग्रेसने म्हटले आहे.

आणखी दोन पोस्टमध्ये केरळ काँग्रेसने दोन्ही पुलाची तुलना करणारी आकडेवारी देत, रश्मिकाचा दावा खोटा ठरवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.