IPS Amitesh Kumar | अमितेश कुमार पुण्याचे नवे पोलीस आयुक्त, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांना महासंचालक (महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य) पदी पदोन्नती

IPS Amitesh Kumar

मुंबई : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांची पदोन्नतीने बदली (महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य) करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आयपीएस रितेश कुमार यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. अमितेश कुमार हे 1995 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. (Pune Police)

रितेश कुमार भारतीय पोलीस सेवेच्या 1992 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. रितेश कुमार यांनी 16 डिसेंबर 2022 रोजी पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर शहरातील गुंडगिरी, वाहतूक समस्या, सायबर गुन्ह्यांसह गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोक्का, तडीपार, एमपीडीए या सारख्या कायद्यांतर्गत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

शहरातील 100 गुन्हेगार स्थानबद्ध

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का, तडीपार, एमपीडीए या कायद्यांचा कठोरपणे अवलंब करीत गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. केवळ एका वर्षाच्या कालावधीत एमपीडीए कायद्यांतर्गत 100 गुन्हेगारांवर कारवाई करुन गुन्हेगारांना राज्यातील विविध कारागृहात त्यांना स्थानबद्ध केले. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीत अशा प्रकारची प्रभावी कारवाई करणारे रितेश कुमार हे पहिलेच पोलीस आयुक्त असावेत.

115 गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोक्का’

पुणे शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी संघटीत गुन्हेगारी करणाऱ्यांवर मोक्का कारवाई करुन गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. रितेश कुमार यांनी त्यांच्या कार्यकाळात तब्बल 115 संघटीत गुन्हेगारांच्या टोळ्यांवर मोक्का कारवाई करुन अनेक गुन्हेगारांना अटक केली आहे. गुन्हेगारांची समाजात निर्माण होत असलेली दहशत कमी करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पोलीस ठाणेनिहाय माहिती घेऊन गुन्हेगारांवर कारवाई कारवाई केल्याने पुणे शहरातील गुन्हेगारीचा आलेख खाली आला आहे. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील 16 जणांवर मोक्का कारवाई केली आहे.

‘तरंग-2023’ यशस्वी आयोजन

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे वतीने पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या संकल्पनेतुन पोलीस दलातील विविध शाखा, घटक यांची परिपुर्ण माहिती जनमानसातील सर्वसामान्य नागरिकांना अवगत व्हावी. तसेच पोलीस व जनता यांचेमध्ये सौदाहर्याचे वातावरण तयार व्हावे. यादृष्टीकोनातुन पुणे शहर पोलीस आयुक्तांनी ‘तरंग-2023’ या मनोरंजनपर कार्यक्रम सोहळयाचे दिनांक 22/12/2023 ते दिनांक 24/12/2023 या कालावधीत पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे याठिकाणी आयोजन केले होते.

भरोसा सेलचा ‘बालस्नेही कक्ष’

पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या संकल्पनेतून गुन्हे शाखेच्या भरोसा सेलच्या वतीने पोलीस ठाण्यात ‘बालस्नेही कक्षा’ची स्थापना करण्यात आली. होप फॉर दी चिल्ड्रन फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यात ‘बालस्नेही कक्षा’ ची स्थापना करण्यात आली आहे. ‘बालस्नेही कक्षा’ मध्ये विधीसंघर्षग्रस्त बालके आणि काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांचे समुपदेशन केले जाते. तसेच वेग वेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून व्होकेशनल कोर्सेसचे प्रशिक्षण देऊन, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मदत केली जाते.

महिलांसाठी ‘विशेष सुरक्षा मोहीम’

पुणे शहर हे शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखले जाते. नोकरीनिमित्त, शिक्षणासाठी अनेक महिला-मुली पुण्यात येत असतात. मात्र पुण्यात महिलांवर होणाऱ्या आत्याचारांचं प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी रात्रीच्या वेळी घरी परतणाऱ्या नोकरदार, महिलांची, विशेषत: आयटी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने विशेष सुरक्षा मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेत गुन्हे शाखा, वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांचा समावेश असून पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्रीची गस्त घालत आहेत.