पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले रा.स्वं.संघाचे शेकडो स्वयंसेवक…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीने उभारले मदत कार्य

0

पुणे : एन पी न्यूज 24 – पुणेकरांसाठी २५ व २६ सप्टेंबरची रात्र अक्षरशः काळ रात्र बनून आली होती. एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले होते. ढगफुटी सदृश्य पावसाने आणि अंबिल ओढा व विविध ओढ्यांना आलेल्या पुण्याच्या दक्षिण भागात महापुराची स्थिती निर्माण केली. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्यावतीने स्वयंस्फूर्तीने मदत कार्य सुरू करण्यात आले असून त्यापासून पूरग्रस्तांना मोठा दिलासा लाभला आहे.

सर्वाधिक नुकसानग्रस्त झालेल्या अंबिल ओढा परिसरात गुरुवारी (ता. २६ सप्टेंबर १९) सकाळपासून मदत कार्य सहायता केंद्र सुरू करण्यात आले. गुरुराज सोसायटी, मोरे वस्ती, इंदिरानगर, अण्णाभाऊ साठे वसाहत, जय मल्हार वसाहत, तावरे कॉलनी, लक्ष्मी नगर, टांगेवाले कॉलनी इ ठिकाणी भोजन, चहा, नाष्टा वितरण केले. यासाठी पुणे शहरातून १५ हजारांहुन अधिक पोळ्यांचे संकलन करण्यात आले. सकाळ व संध्याकाळ मिळून दहा हजार जणांना त्यांच्या घराजवळ जाऊन भोजन चहा नाष्टा वितरण केले.

फूड पॅकेटचे वितरण तसेच परिसरात १ हजारांहून अधिक पाण्याच्या बॉटलचे वितरण केले. या कामात एकूण १६० हुन अधिक स्वयंसेवक सकाळी सहापासून सहभागी झाले होते. मध्यरात्री पूरग्रस्तांना बाहेर काढण्यातही स्वयंसेवकांचा सहभाग होता. यामध्ये तरुण, प्रौढ, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिलांचा सक्रिय सहभाग होता.

दांडेकर पूल, दत्तवाडी, राजेंद्रनगर या ठिकाणी रात्री पुराचे पाणी घरांमध्ये घुसले. स्वयंसेवकांनी पहाटे चार वाजेपर्यंत पाण्यात उभे राहून मदत केली. नांदेड नगरातील कोल्हेवाडी या ठिकाणी रात्री पुराचे पाणी घरांमध्ये शिरले. साधारण ५० हून अधिक कुटुंबे आणि अंदाजे २०० नागरिक बाधित झाले होते. समितीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक सरपंच व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या समन्वयाने मदत कार्य उभे केले. अशी माहिती पुणे महानगर कार्यवाह श्री. महेश करपे यांनी दिली आहे.

पुढच्या मदतकार्यासाठी ‘मधूबन सोसायटी, कोल्हेवाडी’ तात्पुरते सेवाकेंद्र सुरू केले आहे. जनकल्याण समितीच्यावतीने मदतीबरोबर जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये १ हजार मेणबत्त्यांसह १ हजार चादरी व सतरंज्या, कपड्यांचे वितरण केले आहे. परिसरातील सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मंदीर, रस्ते व इतर सार्वजनिक ठिकाणचे चिखल व घाण काढून टाकण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य करण्यात आले. सहकारनगर पर्वती परिसरातील बाराहून अधिक चौकात वाहतूक नियमन करण्यात आले.

दरम्यान या आपत्तीनंतर पूरग्रस्त भागात जनकल्याण समितीतर्फे आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी मोहिम देखील संघातर्फे हाती घेण्यात आली आहे.

visit : http://npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.