चांगल्या कामासाठी कल्पकता, इच्छाशक्ती महत्वाची

साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांचे प्रतिपादन; २५ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे शानदार उद्घाटन

0

अनास्कर, किराड, डॉ. खुर्द, मुसळे, देशपांडे यांना ‘श्री लक्ष्मी माता कला-संस्कृती जीवनगौरव पुरस्कार’

पुणे : एन पी न्यूज 24 – “कोणतेही चांगले काम करण्यासाठी केवळ पैसा, सत्ता आणि पद महत्वाचे नसते. आपल्यातील कल्पकता, प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर मेहनतीची तयारी त्यासाठी आवश्यक असते. पुणे नवरात्रौ महोत्सवाची चळवळ गेली २५ वर्षे त्याच स्वरूपात सुरु आहे. सांस्कृतिक उपक्रमांना सामाजिक जोड दिल्याने हा महोत्सव उत्तरोत्तर बहरत जाईल,” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी केले.

कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य यांचा मनोहारी मिलाफ असणार्‍या आणि पुणे नवरात्र महोत्सव समिती, फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २५ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे गणेश कला क्रीडा मंच येथे नवदुर्गांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. यावेळी डॉ. अरुणा ढेरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता पुणतांबेकर, निर्मला कांदळगावकर, शिक्षणतज्ज्ञ आबेदा इनामदार, भारती बऱ्हाटे, काव्या लडकत, पौर्णिमा लुनावत, डॉ. संगीता मुलानी या नवदुर्गा, आमदार शरद रणपिसे, मोहन जोशी, अंकुश काकडे, सतीश देसाई, मुक्तार शेख, रवींद्र माळवदकर, संयोजक आबा बागुल, जयश्री बागुल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार होते. यावेळी विद्याधर अनास्कर, शंतनु देशपांडे, वीरेंद्र किराड, डॉ. संजीव खुर्द, मानसी मुसळे यांना ‘श्री लक्ष्मी माता कला संस्कृती जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमात सुरवातीला मानसी मुसळे व सहकाऱ्यांनी गणेशवंदना, शमा भाटे यांच्या नादरूप ग्रुपच्या वतीने महाकाली कपालिनी नृत्याचे बहारदार सादरीकरण, विनोद धोकटे व सहकाऱ्यांनी जागरण गोंधळ नृत्य सादर केले. चित्रपटसुष्टीतील शंभर वर्षाचा धावता आढावा निवडक गाण्याच्या नृत्यातुन रत्नाकर शेळके डान्स अकादमीने घेतला. सँडी मांजरेकर व सहकाऱ्यांनी बॉलीवूड का जलवा हा नृत्यांचा बहारदार कार्यक्रम केला. अभिनेत्री भार्गवी चिरमुले, गिरीजा प्रभू, वैष्णवी पाटील, शर्वरी जमनीस, सायली पराडकर, ऐश्वर्या काळे, स्मिता शेवाळे, तेजा देवकर, करिष्मा वागळे, सायली जिया, निकिता मोघे यांच्या फ्युजन डान्सने कार्यक्रमात रंगत आणली.

उल्हास पवार म्हणाले, “विविध क्षेत्रातील स्त्रीशक्तीचा सन्मान करणे कौतुकास्पद आहे. आपल्या पायावर उभ्या राहिलेल्या स्त्रियांना नवदुर्गांच्या रूपात पाहायला मिळाले. या सगळ्या व्यक्तींचे कार्य समाजासाठी खूप मोठे आहे. तळागाळातील, दुर्लक्षित, दुर्बल घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या व्यक्ती करत आहेत. या महोत्सवाने अशा व्यक्तींना सन्मान देऊन नव्या पिढीला सामाजिक कार्य करण्यासाठी, चांगल्या गोष्टी राबविण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. हा महोत्सव म्हणजे पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा आहे.”

प्रास्ताविकात आबा बागुल म्हणाले, “पुण्यावर पुराचे दुर्देवी संकट आले. असे संकट पुन्हा येऊ नये. शिक्षण, साहित्य, उद्योग, व्यवसाय, वैद्यकीय, अभिनय अशा क्षेत्रातील कामाबद्दल नवदुर्गांना गौरविण्यात येत आहे. आम्ही समाजाचे देणे लागतो या उद्देशाने काम करत असतो. समाजात येणाऱ्या कोणत्याही संकटात आमचे कार्यकर्ते मदत करण्यासाठी जातात. देवीची जशी पूजा करता तशी तुम्हाला ज्यांनी घडवलं त्या आई वडिलांची पूजा, सेवा करा.”

 

विद्याधर अनास्कर, वीरेंद्र किराड, शंतनू देशपांडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. घनश्याम सावंत यांनी आभार मानले.

visit : http://npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.