Aundh Pune Crime News | पुणे : पहाटेच्या सुमारास दरोड्याच्या उद्देशाने तिघांना रॉडने बेदम मारहाण, दोघांची प्रकृती चिंताजनक; औंध परिसरातील घटना

0

पुणे : – Aundh Pune Crime News | पुणे शहरामध्ये शस्त्राचा धाक दाखवून किंवा शस्त्राने वार करुन लुटण्याच्या घटना वाढत आहेत. गुरुवारी (दि.13) पहाटे औंध येथे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दरोड्याच्या उद्देशाने तिघांना रॉडने बेदम मारहाण करुन लुटण्याचा प्रयत्न केला (Robbery Case) . यामध्ये जखमी झालेल्या दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना औंध येथील पुर्वी मोबाईल शॉपी समोरील रोडवर आज (गुरुवार) पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबत श्रेयस सतीश शेट्टी (वय-30 रा. अश्विनी सोसायटी, औंध रोड, खडकी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन 20 ते 25 वयोगटातील आरोपीविरोधात आयपीसी 397, 307, 341 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत रामसोबीतकुमार ठक्कु मंडल (वय-38 रा. मंगलम कन्स्ट्रक्शन साईट, परिहार चौक, औंध), समीर रॉय चौधरी (वय-77 रा. सायली गार्डन सोसायटी, औंध) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मेडी पॉईंट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रेयस शेट्टी पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास सायकलवरुन ऑफिसच्या कामासाठी जात होते. औंध येथील पुर्वी मोबाईल शॉपी समोर 20 ते 25 वयोगटातील चार जणांनी दरोड्याच्या उद्देशाने अॅक्टीवा गाडी फिर्यादी यांच्या सायकलला आडवी लावली. आरोपींनी फिर्य़ादी यांच्याकडे पैशांची मागणी केली असता त्यांनी पैसे नसल्याचे सांगतिले. एका आरोपीने जबरदस्तीने खिशात हात घालण्याचा प्रयत्न केला असता फिर्य़ादी यांनी त्याला अडवले. तर दुसऱ्या एका आरोपीने फिर्यादी यांच्या डोक्यात रॉड मारला. मात्र, त्यांनी हाताने अडवला. फिर्यादी तिथून पळून जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग केला.

फिर्यादी यांनी मागे वळून पाहिले असता आरोपींनी मंगलम कन्स्ट्रक्श येथे एका व्यक्तीला मारहाण केली. तसेच रिक्षातून आलेल्या आरोपींनी देखील मारहाण केली. त्यानंतर आरोपी रिक्षा आणि अॅक्टिवा वरुन पळून गेले. फिर्यादी उपचारासाठी मेडीपॉईंट हॉस्पिटल येथे उपचार घेण्यासाठी गेले असता त्याठिकाणी समीर चौधरी यांना देखील आरोपींनी मारहाण केल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आरोपींनी चौधरी यांना रॉडने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. तर मंगलम कन्स्ट्रक्श येथे रामसोबीतकुमार मंडल यांना मारहाण केल्याने त्यांच्यावर देखील उपचार सुरु आहेत.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी, युनीट चारचे पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस निरीक्षक गुन्हे युवराज नांद्रे, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, राजकुमार केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे युवराज नांद्रे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.