Kondhwa Pune Crime News | पुणे : संगणक अभियंत्या मुलाकडून वृद्ध आईचा खून; कोंढव्यातील घटना

0

पुणे : – Kondhwa Pune Crime News | संगणक अभियंता मुलाने वृद्ध आईचा खून केल्याची धक्कादायक घटना कोंढव्यातील एका सोसायटीत घडली आहे. आईचा खून केल्यानंतर आरोपी मुलगा पसार झाला असून कोंढवा पोलीस (Kondhwa Police Station) त्याचा शोध घेत आहे. लता आल्फ्रेड बेंझमिन (वय 73, रा. कुबेरा गार्डन सोसायटी, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. दारुच्या व्यसनासाठी मुलाने आईचा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.

याप्रकरणी लता यांचा मुलगा मिलिंद (वय 43) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिलिंदची मोठी बहीण डॉर्थी मोजेस पनमोजेस (वय 49, रा. सोलेस पार्क, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत लता यांच्या पतीचे वीस वर्षापूर्वी निधन झाले आहे. लता आणि त्यांचा मुलगा मिलिंद एनआयबीएम रस्त्यावरील कुबेरा गार्डन सोसायटीत (Kubera Garden NIBM) राहायला आहेत. मिलिंद संगणक अभियंता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिलिंद बंगळुरुतील एका आयटी कंपनीत कामाला होता. मात्र, कोरोनामुळे त्याची नोकरी गेली. त्यानंतर तो पुण्यात आला. तीन वर्षापासून तो बेकार होता. नोकरी गेल्यानंतर त्याला दारु पिण्याचे व्यसन लागले. तो दारुच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याचे आईसोबत वारंवार वाद होत होते. निवृत्तीनंतर लता एका शाळेत अर्धवेळ शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्यांच्या पगारातून घरखर्च भागवला जायचा.

26 मे रोजी डॉर्थी यांनी संपर्क साधला होता. त्यानंतर तीन दिवस संपर्क झाला नाही. मंगळवारी (दि.28) सायंकाळी लता यांच्या फ्लॅटमधून कुबट वास येत असल्याची माहिती सोसायटी मधील नागरिकांनी फिर्यादी डॉर्थी आणि त्यांची बहिण सुश्मिता यांना दिली. त्यानंतर रात्री त्या दोघी आई राहत असलेल्या फ्लॅटमध्ये गेल्या. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तेव्हा प्रसाधनगृहातील दरवाज्यावर मिलिंदने ‘मॉम इज इनसाईड डोन्ट गो’ असे लिहिले होते. प्रसाधनगृहाचा दरवाजा उघडला असता लता रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. मिलिंद आईचा मोबाईल घेऊन घऱातून पसार झाल्याचे समोर आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मोहसीन पठाण करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.