Subodh Sawaji | EVM मध्ये फेरबदल केल्यास मुख्य निवडणूक आयुक्तांचा खूनही करेन, माजी मंत्र्याची धमकी, गुन्हा दाखल

0

बुलडाणा : Subodh Sawaji | ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करुन काही फेरबदल केला तर मी मुख्य निवडणूक आयुक्तांचा खूनही करेन, अशी धमकी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून दिली. याप्रकरणी सुबोध सावजी यांच्यावर बुलढाण्यातील डोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पत्रात सावजी यांनी ईव्हीएम मशीन बद्दल काळजी व्यक्त केली होती.

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मात्र विरोधकांनी निवडणूक आयोग हा सरकारच्या मर्जीप्रमाणे काम करत असल्याचा आरोप अनेकदा केला. तर, मतदानानंतरही ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामात सीसीटीव्ही बंद असल्यावरुन काही ठिकाणच्या नेत्यांनी आक्षेप घेतले आहेत. आता, यावरूनच माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट अशाप्रकारे उद्विग्न होऊन पत्र लिहिल्याने खळबळ उडाली आहे.

सावजी यांनी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मतदाराचा कौल हा महाविकास आघाडीकडेच आहे, या आधारे एकुण ४८ जागापैंकी ३८ ते ४० लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीच्या येणारचं आहेत. परंतु ,जनतेच्या व माझ्या मनात संशय आहे की, आपण ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करुन लोकशाहीचा गळा घोटणार आहात. पण, असे घडल्यास महाराष्ट्रातील मतदारांच्यावतीने या अन्यायाच्या विरोधात मी आपला गळा घोटल्याशिवाय राहणार नाही.

या पत्रात सावजी यांनी पुढे म्हटले आहे की, माझे वय सध्या ८० वर्षाचे आहे, आता १० किंवा २० वर्षे मला जगायचे आहे. माझ्या डोळयादेखत महाराष्ट्रातील करोडो मतदारांच्या लोकशाही पध्दतीने वापरलेल्या मतदारांच्या अधिकाराचा आपण जर उघड- उघड खून करणार असाल, मुडदा पाडणार असाल तर मी या मतदारांच्या हक्काच्या सन्मानार्थ आपला मुडदा पाडेन किंवा खून करण्यास मागे पुढे पाहणार नाही. लोकशाहीच्या इतिहासात मी माझे नाव अजरामर करेन. अशी चेतावणी देत आहे, असे सावजी यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकरणी सुबोध सावजी यांच्याविरुद्ध ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती डोनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर नागरे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.