Pune Water Crisis | ‘पुणेकरांनो, काटकसरीने पाण्याचा वापर करा; धरणातील पाणीसाठा खालावला

0

पुणे : Pune Water Crisis | मागील वर्षी अल्प प्रमाणात पाऊस असल्याने धरण क्षेत्रातील पाण्याचा साठा कमी झालेला आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाण्याची पातळी खालावली आहे. केवळ १४% पाण्याचा साठा असल्याची माहिती मिळत आहे. (Pune Water Issue)

यंदा धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे साठ्यात वाढ पाहायला मिळाली नाही. मान्सून वेळेवर आला असला, तरी त्यात दम नसल्याने म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. पुणे शहरात आणि जिल्ह्यातील शिरूर, इंदापूर, बारामती, दौंड या भागात पावसाने हजेरी लावली.

शहरात ५ जूनपासून आतापर्यंत २०६ मिमी पावसाची नोंद झाली. जी सरासरी पावसाहून अधिक आहे. हा पाऊस १३५ टक्के झाला आहे. मुठा खोऱ्यामधील चार धरणांची एकूण पाण्याची उपयुक्त क्षमता २९.१५ टीएमसी आहे.

सध्या या चारही धरणांमध्ये मिळून ४.७१ टीएमसी पाणी आहे. गतवर्षी जेमतेम झालेल्या पावसामुळे खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत ही धरणे कशीबशी भरली होती. गतवर्षी परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्यामुळे खडकवासला प्रकल्पात कमी पाणीसाठा झाला.

खडकवासला प्रकल्पातील चार धरणांच्या माध्यमातून पुणे शहराला पाणीपुरवठा होतो. यंदाचा पाणीसाठा हा गेल्या पाच वर्षांतील नीच्चांकी पाणीसाठा आहे. शेतीचे आवर्तन,शहराला आवश्यक असणारे पाणी, बाष्पीभवन या सर्वांचा विचार करून पाण्याचे नियोजन आवश्यक आहे. कारण सध्या प्रचंड उष्णता असून, या व पुढील महिन्यात पावसात खंड पडणार आहे.

खडकवासला प्रकल्पात गेल्यावर्षी याच दिवशी ५.४८ टीएमसी पाणीसाठा होता. त्यावेळी उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण १८.७८ टक्के इतके होते. यंदा पुणे जिल्ह्यात शंभर टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिलेला आहे.

तर देशात १०६ टक्के पाऊस होणार आहे. परंतु, सध्यातरी धरणांतील पाणीसाठा जपून वापरावा लागणार आहे. त्यामुळे ‘पुणेकरांनो, काटकसरीने पाण्याचा वापर करा.’ वेळीच सावध व्हा; अन्यथा गत्यंतर नाही, हे सांगण्याची वेळ आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.