Porsche Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या धनिकपुत्राला पोलिसांकडून रॉयल ट्रीटमेंट, पोलिसांची देखील चौकशी होणार

0

पुणे : – Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एका अल्पवयीन धनिकपुत्राने शनिवारी मध्यरात्री पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती (Kalyani Nagar Accident). हा मुलगा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ‘ब्रह्मा’चे विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांचा मुलगा आहे. त्याने बाईकवरुन जात असलेल्या अनिश अवधिया (Aneesh Awadhiya) आणि अश्विनी कोस्टा (Ashwini Costa) यांना चिरडले होते. यावेळी कार इतक्या वेगात होती की, अश्विनी हवेत उंच फेकली जाऊन जमिनीवर आपटली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. तर अनिस याच्या बरगड्यांना जबर मार लागून त्याचाही मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर जमावाने अल्पवयीन मुलाला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर पोलिसांनी या धनिकपुत्राला विशेष वागणूक दिल्याचे समोर आले. ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कारचालक मुलगा आणि त्याच्या मित्रांना दुपारी दीडच्या सुमारास येरवडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या परवानगीने मुलांसाठी बाहेरुन पिझ्झा आणि बर्गर मागवला होता. एका झिरो पोलिसाने हे खाद्य पदार्थ मागच्या बाजूने पोलीस ठाण्यात आणल्याचे वृत्त एका वेबसाईटने दिले होते.

हा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय नेत्यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करुन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर आता याप्रकरणी पोलिसांचीही चौकशी होणार आहे. पुणे पोलिसांची एक खास टीम तयार केली जाणार आहे. येरवडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. हिट अँड रन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी वेळ लावणे, मेडिकल चेकअप प्रोसेस संथ पद्धतीने केल्या बद्दल पोलिसांची चौकशी होण्याची शक्यता आहे. याशिवाय अल्पवयीन मुलाला व्हीआयपी सेवा प्रकरणी देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. या चौकशीत दोषी आढळल्यास पोलिसांवर कारवाई करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले फडणवीस?
पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास, त्यावेळचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तात्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.