Aundh Hospital Pune |औंध हॉस्पिटलच्या अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकपदी डॉ. कोलोड; डॉ. डोईफोडे अद्याप रजेवरच

0

पुणे : Aundh Hospital Pune | औंध जिल्हा रुग्णालयाच्या अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकपदी येरवडा मनोरुग्णालयातील (Yerwada Mental Hospital) उपअधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड (Dr. Shrinivas Kolod) यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य उपसंचालकांनी ही नियुक्ती केली आहे. औंध रुग्णालयातील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ स्तरावर येथे महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. यामुळे येथील प्रामाणिक कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

रुग्णालयात कामाकडे दुर्लक्ष करून अन्य डॉक्टरांसोबत गप्पा मारत बसणे, चतुर्थश्रेणी कामगारांचे चुकीचे नियोजन, ओपीडीमध्ये न जाणे, रुग्ण न तपासणे, आणीबाणीवेळी रात्रीच्या वेळी उपलब्ध नसणे, रात्री प्रसुतीसाठी आलेल्या गरोदर मातांना ससूनला पाठवणे, अस्वच्छतेकडे दुर्लक्ष इत्यादी तक्रारी सातत्याने येत होत्या. या तक्रारीची गंभीर दखल आरोग्य प्रशासनाने घेतली आहे.

वरील तक्रारी आल्यानंतर त्याची शहानिशा करण्यात आली. यानंतर पुणे परिमंडळचे आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार (Dr Radhakishan Pawar) यांनी येथील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे (Dr Varsha Doiphode) यांची बदली प्रस्तावित केली. त्यानंतर डॉ. डोईफोडे या वैद्यकीय रजेवर गेल्या. त्या अद्याप रजेवरच आहेत.

यामुळे आरोग्य उपसंचालकांनी डॉ. डोईफोडे यांच्या पदाची अतिरिक्त जबाबदारी तेथील डॉ. अंजली मोहोळकर (Dr Anjali Moholkar) यांना दिली. मात्र, डॉ. मोहोळकर या सुद्धा कोणतीही पुर्वसूचना न किरकोळ रजेचा अर्ज देऊन रजेवर गेल्या. या कारणास्तव तातडीने औंध हॉस्पिटलच्या अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकपदी डॉ. कोलोड यांची पुढील आदेश येईपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, आरोग्य प्रशासनाने येथील एका कर्मचाऱ्याची लोहगाव उपजिल्हा रुग्णालयात (Lohegaon Sub District Hospital) बदली केली आहे. याशिवाय सहायक जमादाची रवानगी त्याच्या मुळ सेवक या पदावर केली आहे.

रुग्णालयात मनमानी करणारे आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ते निर्णय घेण्यास सुरूवात केल्याने येथे प्रामाणिकपणे काम करणारे कर्मचारी समाधान व्यक्त करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.