फारुख अब्दुल्लांची कैद आणखी ३ महिन्यांनी वाढवली

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – जम्मू काश्मीरमधील कलम ३७० काढल्यानंतर तेथे सुरक्षा आणि शांततेच्या कारणास्तव काही राजकीय नेत्यांना कैद करण्यात आले आहे. यामध्ये जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख खासदार फारुख अब्दुल्ला यांचाही समावेश आहे. अब्दुल्ला हे ५ ऑगस्टपासून कैदेत आहेत. आता त्यांची कैद आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जम्मू काश्मीरच्या गृह मंत्रालयाच्या सल्लागार समितीने फारुख अब्दुल्ला यांच्या कैदेचा आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांची कैद आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या निवासस्थानालाच जेल घोषित करण्यात आले आहे. १७ सप्टेंबरला फारुख अब्दुल्ला यांच्यावर जनसुरक्षा कायदाही लावण्यात आला होता. या कायद्यांतर्गत कोणत्याही व्यक्तीला सुनावणी न घेता तीन ते सहा महिन्यांपर्यंत कैदेत ठेवता येते.

जम्मू काश्मीरचे इतर दोन माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तीही सध्या कैदेत आहेत. फारुख अब्दुल्ला हे खासदारही आहेत. त्यांना संसदीय अधिवेशनाला येण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. अब्दुल्ला यांना अवैधरित्या कैद करण्यात आल्याची याचिका एमडीएमके नेते वायको यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.