ईशान्येतील हिंसेला काँग्रेस जबाबदार : अमित शहा

0

गिरीडीह : एन पी न्यूज 24 – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ईशान्य भारतात जी हिंसक आंदोलने होत आहेत, त्यास काँग्रेसच जबाबदार आहे. भाजपने हा कायदा आणल्याने काँग्रेसला पोटशूळ उठला आहे. काँग्रेस पक्ष हिंदू-मुस्लिम राजकारण, नक्षलवाद आणि दहशतवादाला खतपाणी घालत आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. ते झारखंड येथे बोलत होते.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून हा कायदा मुस्लिमविरोधी आणि संविधानविरोधी असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत काँग्रेसने देश बचाओ रॅली काढली होती. या रॅलीत काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. शहा म्हणाले, आम्ही तिहेरी तलाक कायदा आणला तर काँग्रेसने त्याला मुस्लिमविरोधी म्हटले होते. ३७० कलम हटवले तेसुद्धा त्यांना मुस्लिमविरोधी वाटत होते. आता नागरिकत्व दुरुस्ती कायदाही काँग्रेसला मुस्लिमविरोधी वाटत आहे. काँग्रेस ईशान्येत हिंसा भडकवत आहे.

काँग्रेस पक्ष अनेक वर्षे हिंदू मुस्लिम राजकारण, नक्षलवाद आणि दहशतवादाला खतपाणी घालत आली आहे. दहशतवादासारख्या समस्येला नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान येऊन रोखतो, तेव्हा ते त्यांना वोट बँकेचे राजकारण वाटते. प्रत्येक गोष्टीला मुस्लिमविरोधी म्हणणे ही काँग्रेसची जुनी खोड आहे, असे शहा म्हणाले.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.