हॉटेलवर भेटायला ये, नाहीतर…तरूणींना धमकावणारा विकृत पोलिसांच्या ताब्यात

नाशिक : एन पी न्यूज 24 – हॉटेलमध्ये भेटण्यास आली तरच माझ्या मोबाईलमध्ये असलेले तुझे फोटो डिलीट करून टाकीन, असे महाविद्यालयीन तरूणीला धमकावणाऱ्या एका विकृत तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो तरुणींना सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लिल मेसेज पाठवत असे आणि त्यानंतर भेटण्यासाठी धमकावत असे. एकाच मोबाईलमधून त्याने तीन वेगवेगळ्या क्रमांकाचा वापर करून २४ मुलींना त्रास दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात घडली आहे.
याप्रकरणी एका पीडितेने फिर्याद दाखल केल्यानंतर नाशिक सायबर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. संशयिताचे नाव युवराज बाजीराव डुंबरे असे आहे. मागच्या रविवारी युवराज डुंबरेने पीडितेच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपवरून अश्लिल मेसेज पाठविले. तो सतत अशाप्रकारचे मेसेज पाठवत होता. नंतर त्याने पीडितेला मेसेज पाठवून हॉटेलमध्ये भेटण्यासाठी धमकावले. भेटायला आलीस तरच माझ्या मोबाईलमधील तुझे फोटो डिलीट करेन असे धमकावल्याचे पीडितेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवराज बोरसे यांनी वेगाने तपास करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे युवराजला अटक केली. युवराजने एकाच मोबाईलमधून तीन वेगवेगळ्या क्रमांकाचा वापर करून औरंगाबाद येथील एका पीडितेसह तब्बल २४ मुलींना त्रास दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. न्यायालयाने त्यास २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.