धीरे धीरे प्यार को बढाना है, नवाब मलिकांचे संजय राऊतांसाठी ट्विट

11th December 2019

मुंबई : एन पी न्यूज 24 – भाजपाला बाजूला सारून राज्यात वेगवेगळ्या विचारांचे शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी हे तिन पक्ष एकत्र आले आहेत. यापैकी शिवसेनेचे विचार अन्य दोन पक्षांपेक्षा खुपच भिन्न असल्याने या मित्रपक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्यातील प्रेम अधिक घट्ट होण्याची गरज असल्याचे दर्शविण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासाठी एक खास ट्वीट केले आहे. या ट्विटवरून सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

ट्विटमध्ये नवाब मलिक यांनी हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध गिताच्या ओळी लिहिल्या आहेत. धीरे धीरे प्यार को बढ़ाना है, हद से गुजर जाना है, अशा त्या ओळी आहेत. मलिक यांनी ही ट्विट खासदार संजय राऊत यांनी टॅग केले आहे. शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यातील जवळीक आणखी वाढविण्यासाठी हे ट्विट नवाब मलिक यांनी केले असल्याचे म्हटले जात असले तरी यामागे नागरिकत्व सुधारणा विधेयक असल्याचे बोलले जात आहे. देशात नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन मोठा गोंधळ सुरू आहे. हे विधेयक ३११ मताने मंजूर झाले आहे. आज राज्यसभेत ते मांडले आहे. या विधेयकावर शिवसेनेची भूमिका संभ्रमाची असल्याने नवाब मलिकांनी हे ट्विट केले असावे, अशी चर्चा आहे. दरम्यान, लोकसभेत शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान करत भाजपला साथ दिल्याने शिवसेनेच्या या भूमिकेवर काँग्रेसने जाहीर नाराजी व्यक्त केली होती.