सणांसाठी पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेणे किती योग्य ?

0

पुणे : एन पी न्यूज 24 – लग्न असो, सण असो किंवा धार्मिक कार्य असो मासिक पाळीची अडचण नको म्हणून अनेक महिला पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतात. इतकंच नव्हे, तर सहलीला जायचं असल्यास अनेक तरुणीही या गोळ्यांचा वापर करतात. मात्र नैसर्गिकरित्या महिलांच्या शरीरात सुरू असलेले हे मासिक पाळीचं चक्र आपल्या गरजेनुसार वारंवार बदलणं योग्य आहे का?

मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतल्यानं मासिक पाळीसाठी गरजेच्या असलेल्या हार्मोन्समध्ये बदल होतात. त्यामुळे गोळ्या सुरू असेपर्यंत पाळी येत नाही. मात्र गोळ्या घेणं थांबवताच पाळी सुरू होते. त्यामुळे पाळीच्या अपेक्षित तारखेआधी काही दिवस या गोळ्या घेण्यास सुरुवात होते आणि मासिक पाळी नको असेल, तितके दिवस या गोळ्या घेतल्या जातात.

तर होतील दुष्परिणाम

मुंबईतील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अंजली बापट यांनी सांगितलं, “मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या एखादवेळेस ठिक आहे, मात्र त्याची सवय लावून घेऊ नका. अनेक स्त्रियांनी या गोळ्या घेणं योग्य नसतं, त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी, त्यानंतर गोळ्या घ्याव्यात. डॉक्टर त्या महिलेची पूर्ण माहिती जाणून घेतात आणि त्यानंतर या गोळ्या देतात. त्यामुळे वैद्यकीय सल्लानुसारच गोळ्या घ्या. थेट मेडिकलमधून घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होतील.” गोळ्या घेणं थांबल्यानंतर सहसा मासिक पाळी सुरू होते. मात्र काहींना पाळी न येण्याची शक्यता असते. त्यामुळे काही दिवसात पाळी न आल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा. शिवाय पुढील महिन्याची पाळी नियमित होते की नाही हेदेखील तपासा आणि त्याबाबतही तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या.

visit : http://npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.