तुमच्या वयासाठी कोणता व्यायाम योग्य

पुणे : एन पी न्यूज 24 – नियमित व्यायाम केल्यानं तुमची शारीरिक क्षमता वाढते, शारीरिक वेदना दूर होतात आणि भविष्यातील दीर्घकालीन आजाराचा धोकाही टळतो. मात्र वाढत्या वयानुसार शरीराच्या मर्यादाही बदलत जातात. त्यामुळे वयोमानानुसार व्यायामही बदलत राहणं गरजेचं आहे. कोणत्या वयात कोणता व्यायाम करावा, हे जाणून घेऊयात.
२० वय
या वयात शारीरिक कार्य करण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे व्यायाम करण्याची सवय ठेवा. तज्ज्ञांच्या मते, या वयात तुम्ही एरोबिक एक्सरसाईज करू शकता, स्ट्रेंथ ट्रेनिंग घेऊ शकता. तसंच आठवड्यातून किमान २ दिवस वेट ट्रेनिंग, टेनिस, हायकिंग करू शकता.
३० ते ४० वयोगट
३० ते ४० हे वय करिअरचं असतं. या वयातील व्यक्ती कामात व्यस्त असतात. ऑफिसमध्ये बसून काम करत असल्यास शारीरिक स्थितीवर परिणाम होत असतो. या वयात पाठीची दुखणी बळावतात. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी हाय इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंह हा उत्तम मार्ग आहे. त्यामुळे फॅट जास्त बर्न होईल, शारीरिक क्षमता वाढेल, रक्तातील शर्करा कमी होई आणि इतर फायदेही होतील.
५० ते ६० वयोगट
या वयात अनेक शारीरिक वेदना तर जाणवतातच मात्र टाईप-२ मधुमेह आणि हृदयाचे आजारही बळावण्याचा धोका असतो. त्यामुळे या वयातील व्यक्तींनी नाच, चालणे असा व्यायाम करावा. नाचण्यामुळे बौद्धिक क्षमताही चांगली राहते. वयस्कर व्यक्तींचा तोल न सांभाळता आल्यानं अनेकदा त्या पडतात, त्यामुळे वॉटर एरोबिक केल्यासही फायदेशीर ठरेल.
७० आणि त्यापेक्षा जास्त वय
वाढत्या वयामुळे यावेळी अनेक जण अकार्यशील होतात. मात्र या वयातही कोणत्या ना कोणत्या प्रकारे शारीरिक हालचाल करत राहणं गरजेचं आहे. मात्र प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेवर त्याचं शारीरिक कार्य अवलंबून असतं. काही व्यक्ती या वयातही धावू शकतात तर काहींना सायकलिंग किंवा चालण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे या वयात व्यायामासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या.
तुमच्यासाठी नेमका कोणता व्यायाम योग्य आहे, हे तुमची शारीरिक क्षमता, आरोग्य आणि आहारावरही अवलंबून आहे. त्यामुळे कोणत्याही वयात व्यायाम करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यानुसारच शारीरिक हालचाल किंवा व्यायाम करा.
visit : http://npnews24.com