मोबाईल, टॅबलेटमुळे मुलं उशिरा बोलतात ?

0

पुणे : एन पी न्यूज 24 – पूर्वी जेव्हा मोबाईल, टॅबलेट हे प्रकार नव्हते, तेव्हा लहान बाळांना आई-बाबा, दादा-ताई, आजी-आजोबा, आत्या-मावशी, काका-काकी या सर्व शब्दांची ओळख करून दिली जायची. या शब्दांचा अर्थ त्या बाळाला माहिती नसायचा मात्र बोलण्यास सहजसोपे असे शब्द तो आपल्या बोबड्या बोलीत बोलण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर हळूहळू २-३ शब्द जोडून अर्धवट हा होईना पण एखादं वाक्य बोलायचा. अगदी जास्तीत जास्त वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत ते बाळ आपल्या बोबड्या बोलीत संभाषण करत सर्वांना आकर्षित करायचं.

मात्र आता या सर्वाची जागा घेतली ती मोबाईल आणि टॅबलेटनं…कामात बिझी असलेले त्याचे पालक एखादं इज्युकेशनल अॅप मोबाईल, टॅबलेटमध्ये डाऊनलोड करतात आणि बाळाच्या हातात देतात. आपल्या एका क्लिकवर येणारा आवाज, डान्स, संगीत ऐकून बाळालाही त्याचं कुतूहल वाटतं. त्यावर ते हसून नाचून प्रतिक्रिया देतं. मात्र थांबा तुम्हाला वाटतं यामुळे तुमचं बाळ लवकर हुश्शार होईल, तर तसं नाही… खरं तर तुमचं बाळ यामुळे उशिरा बोलू लागेल.

काय झालं…धक्का बसला ना ऐकून…? मात्र तुमचं बाळ जितका वेळ मोबाईल, टॅबलेट वापरेल तितकं ते उशिरा बोलेल, असं कॅनडातील संशोधकांनी केलेल्या संशोधनात दिसून आलं आहे. सॅन फ्रान्सिस्कोतील पिडियाट्रिक अकॅडमिक सोसायटीजच्या बैठकीत हे संशोधन मांडण्यात आलं.

संशोधकांनी ६ महिने ते २ वर्ष वयोगटातील जवळपास ९०० मुलांचा अभ्यास केला. त्यात २० टक्के मुलं दिवसाला सरासरी २८ मिनिटं स्क्रिनसमोर राहत असल्याचं दिसून आलं. तर प्रत्येकी ३० मिनिटं स्क्रिन टाईममुळे बाळाला स्पिच डेव्हलमेंटचा धोका ४९ टक्क्यांनी वाढतो असं आढळलं.

संशोधनाच्या अभ्यासिका डॉ. कॅथरिन बिर्केन यांच्या म्हणण्यानुसार “मोबाईल, टॅबलेट आणि लहान मुलं उशिरा बोलणं यात संबंध असल्याचं आमच्या अभ्यासात दिसून आलं. असे असेल, तर त्यामागे नेमकं कारण काय आहे हे शोधण्यासाठी अधिक अभ्यास करण्याची गरज आहे. मुलांना या साधनांमध्ये काय दाखवलं जातं किंवा ते आपल्या पालकांच्या उपस्थितीत साधन वापरतात की नाही, याचा पुढील अभ्यासात समावेश करावा लागेल.”

त्यामुळे आपल्या मुलांची भाषा आणि संभाषण विकसित करण्यासाठी पालकांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना भाषा शिकवावी. त्यांच्याशी बोलावं, खेळावं, त्यांना वेगवेगळे शब्द सांगावेत, वेगवेगळ्या गोष्टी दाखवाव्यात, कथा सांगाव्यात, असंही संशोधकांनी सांगितलं आहे.

visit : http://npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.