महाराष्ट्र पोलीस दलाच्या ई-लर्निंग सेंटरचे महासंचालकांच्या हस्ते उद्घाटन

0

पुणे : एन पी न्यूज २४ – आधुनिक तंत्रज्ञानामुळे संपर्क यंत्रणांमध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होत आहे. यामध्ये संगणकीय प्रणालीवर आधारीत अशा आधुनिक यंत्रणा कार्य़ान्वीत झाल्या आहेत. पोलिसांना देखील या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी त्यांना त्याचे प्रशिक्षण देता यावे यासाठी पुण्यातील पोलीस बिनतारी संदेश मुख्यालयात उभारण्यात आलेल्या बहुउद्देशिय ई-लर्निंग सेंटरचे उद्घाटन पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल यांच्या हस्ते आज (बुधवार) करण्यात आले. या सेंटरची उभारणी बिनतारी संदेशचे अपर पोलीस महासंचालक व संचालक रितेश कुमार यांच्या संकल्पनेतून करण्यात आली आहे.

पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नवीन संदेश तंत्रज्ञान (latest communication technology), संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंग (computer hardware and networking), सायबर सुरक्षा (cyber security) अशा अत्याधुनिक प्रणालीचे प्रशिक्षण आणि माहिती या ठिकाणी देण्यात येणार आहे. एकाच वेळी 103 जणांना याठिकाणी प्रशिक्षण देता येणार आहे.

या ई-लर्निंग सेंटरमुळे विविध विषयांवरील प्रशिक्षण देणे शक्य होणार आहे. यासाठी संबंधीत विषयातील तज्ज्ञ पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे राज्यातील विविध ठिकाणी असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरंन्सींगद्वारे प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

यावेळी ई-लर्निंग सेंटरची संकल्पना, उद्दीष्ट व भविष्यकालीन उपयुक्तता याबाबत बिनतारी संदेश अपर पोलीस महासंचालक व संचालक रितेश कुमार यांनी विस्तृत माहिती दिली. येणाऱ्या काळामध्ये पोलीसदलाची विविध अ‍ॅप्स एकाच छत्राखाली आणण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प प्रगतीपथावर असून नजिकच्या कालावधीमध्ये पुर्णत्वास येईल. महाराष्ट्र पोलीस कालानरुप तंत्रज्ञान अवगत करून अग्रेसर राहण्यामध्ये प्रयत्नशिल असल्याचे अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून पोलीस दलापुढील आव्हाने विचारात घेऊन तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा अशी अपेक्षा पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल यांनी व्यक्त केली.

यावेळी पुणे पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम, अपर पोलीस महासंचालक ( राज्य गुन्हे अन्वेषण विभाग ) अतुलचंद्र कुलकर्णी, अपर पोलीस महासंचालक (कारागृह) सुनिल रामानंद तसेच पोलीस दलातील विविध विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.