Arun Gawli | कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ ‘डॅडी’ लवकरच येणार बाहेर? हायकोर्टाचे राज्य सरकारला ‘हे’ आदेश

0

नागपूर : Arun Gawli | मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शासनाच्या निर्णयानुसार शिक्षेत सूट मिळण्यासाठी गवळीने अर्ज केला होता. हा अर्ज कारागृह अधीक्षकांनी फेटाळल्यानंतर गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने राज्य सरकारला आदेश दिले की, १० जानेवारी २००६ रोजीच्या शासन निर्णयानुसार शिक्षेत सूट देण्याच्या मागणीवर चार आठवड्यात निर्णय घ्या. त्यामुळे अरूण गवळीची तुरूंगातून सुटका होण्याची शक्यता आहे.

गवळीच्या याचिकेवर न्यायमूर्ती विनय जोशी व वृषाली जोशी यांच्या समोर सुनावणी झाली. गवळीतर्फे ऍड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली. यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला वरील आदेश दिले.

अरूण गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. १० जानेवारी २००६ रोजीच्या शासन निर्णयामध्ये १४ वर्षे कारावास भोगलेल्या आणि वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या कैद्यांना शिक्षेत सूट देण्याची तरतूद आहे. गवळीने वयाची ७० वर्षे पूर्ण केली असून तो मे-२००८ पासून कारागृहात आहे.

या तुरतुदीनुसार गवळीने कारागृह अधीक्षकांना सुट मिळण्यासाठी अर्ज केला. परंतु, कारागृह अधीक्षकांनी गवळीला या शासन निर्णयाचा लाभ दिला जाऊ शकत नाही, असे कारण देत त्याचा अर्ज १२ जानेवारी २०२३ रोजी फेटाळला. यानंतर गवळीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.