Pune Lok Sabha | मतदारांच्या सोयीसाठी प्रशासनाच्या सुविधा; मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

0

पुणे : Pune Lok Sabha | लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुणे लोकसभा अंतर्गत मतदार संघातील २ हजार १८ मतदान केंद्रांवर १३ मे रोजी मतदान होणार असून मतदारांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या दिवशी अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी (Pune Collector) तथा पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे (Suhas Diwase) यांनी केले आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघांतर्गत वडगाव शेरी विधानसभा मतदार (Vadgaon Sheri Vidhan Sabha) संघात ४५३, शिवाजीनगर (Shivaji Nagar Vidhan Sabha) २८०, कोथरुड (Kothrud Vidhan Sabha) ३९७, पर्वती (Parvati Vidhan Sabha) ३४४, पुणे कॅन्टोन्मेंट (Pune Cantonment Vidhan Sabha) २७४ व कसबा पेठ विधानसभा मतदार (Kasba Vidhan Sabha) संघात २७० अशा एकूण सहा विधानसभा मतदार संघातील २ हजार १८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. पुणे लोकसभा तसेच शिरुर (Shirur Lok Sabha) व मावळ लोकसभा मतदार (Maval Lok Sabha) संघात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन मतदार चिठ्ठयांचे मतदान वितरण सुरु असून मतदार चिठ्ठ्या वितरणाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.

मतदारांच्या सोयीसाठी उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांमध्ये मतदार यादीत नाव शोधण्यासाठी तसेच मतदान केंद्राची माहिती मिळवता यावी यासाठी ‘नो युवर पोलींग स्टेशन’ ची सुविधा पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्ड ऑफीसमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्ह्यातील विशेषत: शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून गृहनिर्माण संस्थांमध्येही जनजागृती करण्यात येत आहे.

पुणे लोकसभा मतदार संघांतर्गत सहा विधानसभा मतदार संघात मतदान केंद्रांवर २ हजार २४५ केंद्राध्यक्ष, २ हजार ८७६ प्रथम मतदान अधिकारी व ६ हजार ५५ इतर मतदान अधिकारी असे एकूण ११ हजार १७६ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये वडगाव शेरी मतदार संघासाठी २ हजार १११,शिवाजीनगर २ हजार ८५०,कोथरुड १ हजार ६७४, पर्वती ९७८, पुणे कॅन्टोंमेंट २ हजार ६३८ तर कसबा पेठ विधानसभा मतदार संघासाठी ९२५ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेविषयी दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतदान पथक मतदान साहित्यासह १२ मे रोजी मतदान केंद्रावर जातील.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर किमान आश्वासित सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यामध्ये दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था, उन्हाळ्याचा त्रास टाळण्यासाठी मंडपाची व्यवस्था, वेटींग रुम, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच मेडीकल कीट व ओआरएसची पाकिटे प्रत्येक मतदान केंद्रांवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेऊन मतदान करावे, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.