Pune CP Amitesh Kumar On Kalyani Nagar Accident | पुणे हिट अँड रन प्रकरण : आरोपी दारू पिऊन कार चालवित होता, कोणालाही सोडणार नाही; पोलीस आयुक्त अमितेश कुमार

0

पुणे : – पुण्यातील कल्याणी नगर जंक्श या ठिकाणी रविवारी पहाटे नंबर प्लेट नसलेल्या पोर्श कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर ज्या पोर्शे कारने दोघांना धडक दिली ती कार पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा चालवत होता. तर घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी कार चालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला लगेच जामीन मंजूर झाल्याने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. (Pune Porsche Car Accident )

दरम्यान, याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या बापावर मुलाला चारचाकी वाहन दिल्याप्रकरणी तसेच मुंढवा येथील कोझी हॉटेलचे प्रल्हाद भुतडा व मॅनेजर सचिन अशोक काटकर आणि ब्लॅक पबचे मॅनेजर संदीप रमेश सांगळे, जयेश सतीश बोनकर यांच्यावर अल्पवयीन मुलांना दारु पुरवल्या प्रकरणी बाल न्याय कायद्याच्या कलम 75 आणइ 77 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

‘त्या’ आमदाराला कारवाईचा इशारा

नियमानुसार या गंभीर प्रकरणामध्ये भरधाव वेगाने वाहन चालवणारा तो बड्या बापाचा अल्पवयीन मुलगा, त्याचे पालक हे मुख्य जबाबदार आहेतच. मात्र, याशिवाय विनाक्रमांकाची कार देणारा संबंधित शोरुमचा मालक, पोलीस प्रशासन, आरटीओ आणि हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकणारा ‘तो’ आमदार देखील दोषी आहे. या प्रकरणावर बोलताना पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिसांवर कार्यवाहीवर दबाव टाकणाऱ्या ‘त्या’ आमदारालाही कारवाईचा इशारा दिला आहे.

मुलगा दारु पिऊन गाडी चालवत होता

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, कल्याणीनगर भागात काल घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी दारु पिऊन कार चालवित होता. ही बाब स्पष्ट झाली असून या प्रकरणी आम्ही पब मालक, आरोपीचे वडील आणि विना नंबर प्लेट गाडी देणाऱ्या शो रुमच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी हा कागदपत्रांच्या आधारे अल्पवयीन असल्याचे दिसून आले. त्यामुळे न्यायालयाने काही अटीच्या आधारे जामीन दिला आहे. पण हा मुलगा खरच अल्पवयीन आहे का? याबाबतचा तपास आमची टीम शाळेत जाऊन करत आहे. तसेच आम्ही दिल्ली येथील निर्भया प्रकरणी आरोपींना जामीन दिला नव्हता त्यानुसार या आरोपीला जामीन देता कामा नये अशी मागणी देखील केली होती. मात्र, आमची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.

कायद्यापुढे सर्वजण समान

आम्ही आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी चर्चा होत आहे. पण आम्ही सर्व प्रकारची कलम लावली आहेत. तरी देखील कोणी चर्चा करीत असेल तर समोरासमोर चर्चा करण्यास तयार आहोत, तसेच या प्रकरणी आम्ही कोणालाही सोडणार नाही. कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. आम्ही आरोपी विरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.