Maval Lok Sabha | मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ! पात्र मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे- दीपक सिंगला

0

पुणे : मावळ लोकसभा मतदासंघात (Maval Lok Sabha) सोमवार १३ मे रोजी मतदान होत असून सर्व घटकातील पात्र मतदारांनी आपली जबाबदारी, कर्तव्य समजून या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे; आपल्या परिचयातील सर्व मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला (Deepak Singla IAS) यांनी केले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी व चिंचवड तर रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या लोकसभा मतदारसंघाकरीता होणारी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नि:पक्ष, निर्भय, निकोप आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. प्रशासनाच्यावतीने मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, दिव्यांगासाठी रॅम्प, सुरक्षा व्यवस्था, उन्हाळ्याची स्थिती लक्षात घेता औषधे, पाच पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या मतदान केंद्रावर बैठकव्यवस्था, उन्हाळा लक्षात घेता मंडप उभारणी आदी सुविधेसोबतच इतर तांत्रिक बाबींची पूर्तताही करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. सिंगला यांनी दिली.

मतदानासाठी बोटीसह ५२५ वाहनांची व्यवस्था

मावळ लोकसभांतर्गत विधानसभा मतदारसंघ निहाय वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी लागणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे १२ हजार मतदान अधिकारी, कर्मचारी तसेच मतदान यंत्रांच्या वाहतुकीकरिता एका बोटीसह १७५ पीएमपीएमल बसेस, २१९ एसटी महामंडळाच्या बसेस, १०५ मिनी बसेस, २५ ईव्हीएम कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे.

२ हजार ५६६ मतदान केंद्रावर एकूण ११ हजार ३६८ मतदान अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत. तसेच संवेदनशील मतदान केंद्रांवर ८३ सूक्ष्म निरीक्षक देखील नियुक्त करण्यात आले आहेत.

मतदानासाठी ९हजार ५८१ बॅलेट युनिट, ३५९१ कंट्रोल युनिट आणि ३८१६ व्हीव्हीपॅट यंत्रांची आवश्यकता असून या यंत्रांची सरमिसळ करून विधानसभा निहाय त्यांचे वितरण देखील करण्यात आले आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्तरावर मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देखील वेळोवेळी दिले जात आहे.

मावळ लोकसभा मतदार संघात २५ लाख ८५ हजार मतदार

मावळ लोकसभा कार्यक्षेत्रात २५ लाख ८५ हजार १८ मतदार असून यामध्ये १३ लाख ४९ हजार १८४ पुरूष मतदार, १२ लाख ३५ हजार ६६१ महिला मतदार आणि १७३ तृतीयपंथी मतदार आहेत. या मतदारसंघात ३३ उमेदवार निवडणूकीसाठी रिंगणात आहेत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ९ हजार २३६ बॅलेट युनिट, ३ हजार ५९१ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ८१६ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये (Panvel Assembly Constituency) एकूण ५ लाख ९१ हजार ३९८ मतदार आहेत. त्यामध्ये ३ लाख १७ हजार ९६ पुरूष, २ लाख ७४ हजार २३१ महिला तर ७१ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. तसेच पनवेल मतदारसंघात ५४४ मतदान केंद्रे असून याठिकाणी २ हजार ४०४ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर २हजार ६२ बॅलेट युनिट, ७५० कंट्रोल युनिट आणि ७८८ व्हीव्हीपॅट लागणार आहेत. यासाठी ४६ वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. ८६ एसटी बसेस, १५ मिनी बसेस, २० जीप, ४ ईव्हीएम कंटेनर अशा १२५ वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये (Karjat Vidhan Sabha) एकूण ३ लाख ९ हजार २०८ मतदार असून त्यामध्ये १ लाख ५५ हजार २८६ पुरूष, १ लाख ५३ हजार ९१७ महिला तर ५ तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून ३३९ मतदान केंद्रे असून याठिकाणी १ हजार ५०० मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच १ हजार 3२० बॅलेट युनिट, ४६७ कंट्रोल युनिट आणि ४९१ व्हीव्हीपॅटची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी ४७ वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. ४३ एसटी बसेस, २१ मिनी बसेस, ८ जीप, ६ ईव्हीएम कंटेनर अशी ७८ वाहने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

उरण विधानसभा मतदारसंघामध्ये (Uran Assembly Constituency) एकूण ३ लाख १९ हजार ३११ मतदार असून त्यामध्ये १ लाख ६० हजार ७०९ पुरूष, १ लाख ५८ हजार ५९३ महिला तर ९ तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून ३४४ मतदान केंद्रे असून याठिकाणी १ हजार ५२० मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर १ हजार ३४१ बॅलेट युनिट, ४७४ कंट्रोल युनिट आणि ४९८ व्हीव्हीपॅट लागणार आहेत. यासाठी ६० वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. ४१ एसटी बसेस, २२ मिनी बसेस, २८ जीप, ४ ईव्हीएम कंटेनर आणि १ बोट अशी ९६ वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये (Maval Vidhan Sabha) एकूण ३ लाख ७३ हजार ४०८ मतदार असून त्यामध्ये १ लाख ९१ हजार ७०२ पुरूष, १ लाख ८१ हजार ६९३ महिला तर १३ तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून ३९० मतदान केंद्रे असून याठिकाणी १ हजार ७३२ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच १ हजार ४२२बॅलेट युनिट, ५५३ कंट्रोल युनिट आणि ५९२ व्हीव्हीपॅट आवश्यक आहेत. यासाठी ४५ वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. ४९ एसटी बसेस, २७ मिनी बसेस, २० जीप, ३ ईव्हीएम कंटेनर अशी ९९ वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये (Chinchwad Vidhan Sabha) एकूण ६ लाख १८ हजार २४५ मतदार असून त्यामध्ये ३ लाख २७ हजार ९६१ पुरूष, २ लाख ९० हजार २३९ महिला तर ४५ तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून ५४९ मतदान केंद्रे असून याठिकाणी २ हजार ४३६ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर १ हजार ९७६ बॅलेट युनिट, ७७९ कंट्रोल युनिट आणि ८३९ व्हीव्हीपॅटची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी ४८ वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. १०२ पीएमपीएमएल बसेस, २० मिनी बसेस, १६ जीप, ४ ईव्हीएम कंटेनर अशी १४२ वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये (Pimpri Vidhan Sabha) एकूण ३ लाख ७३ हजार ४४८ मतदार आहेत. त्यामध्ये १ लाख ९६ हजार ४३० पुरूष, १ लाख ७६ हजार ९८८ महिला तर ३० तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून ४०० मतदान केंद्रे असून याठिकाणी १ हजार ७७६ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या केंद्रांसाठी १ हजार ४६० बॅलेट युनिट, ५६८ कंट्रोल युनिट आणि ६०८ व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी ४५ वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. ७३ पीएमपीएमएल बसेस, १ जीप, ४ ईव्हीएम कंटेनर अशी ७८ वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

मतदारांनी मतदान केंद्रामध्ये भ्रमणध्वनी घेऊन जावू नये. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता येत्या 13 मे रोजी आपला मताचा पवित्र हक्क बजावून लोकशाहीच्या सक्षमीकरणात योगदान द्यावे, असे आवाहनही श्री. सिंगला यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.