Pimpri Chinchwad Police MCOCA Action | पिंपरी : अपघाताचा बनाव करुन खून करणाऱ्या शाहरुख खान टोळीवर ‘मोक्का’!

0

पिंपरी : – Pimpri Chinchwad Police MCOCA Action | पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून महिलेवर पाळत ठेवली. महिला तिच्या पतीसोबत रस्त्याने पायी चालत जात असताना तिच्या अंगावर टेम्पो घालून तिला धडक दिली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणाच्या तपासा दरम्यान हा अपघात नसून खून असल्याचे समोर आले. हा गुन्हा सराईत गुन्हेगार शाहरुख खान व त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शाहरुख खान टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

टोळी प्रमुख शाहरुख खान (रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड), आनंद किशोर वाल्मिकी (वय 29, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड), परशुराम उर्फ परश्या सुनील माने (वय 24, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड), रोहित नागनाथ गायकवाड (वय 23, रा. हडपसर, पुणे) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. शाहरुख खान आणि त्याच्या साथीदारांनी 3 मार्च 2024 रोजी रात्री सव्वा नऊ वाजता एका दाम्पत्याला टेम्पोने दिली. त्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. तपासादरम्यान आरोपींनी अपघाताचा बनाव करून खून केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता संतोषकुमार कांबळे (वय-45) आणि त्यांचे पती संतोषकुमार कांबळे हे त्यांचे दुकान बंद करुन पायी चालत जात होते. त्यावेळी त्यांना एका टेम्पोने धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन लता कांबळे यांचा मृत्यू झाला. तर संतोष कुमार कांबळे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी सुरुवातीला अपघाताची नोंद करण्यात आली.

गुन्ह्याचा तपास करत असताना हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता घटना घडण्यापूर्वी तीन ते साडेतीन तास एक टेम्पो संशयितपणे परिसरात फिरत असल्याचे दिसले. तसेच टेम्पोची पुढील व मागील नंबर प्लेट झाकण्यात आली होती. पोलिसांचा टेम्पोवर संशय बळावल्याने चालकाचा शेध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांनी गुन्ह्यात आयपीसी 302, 307 आणि 120(ब) या कलमांची वाढ केली.

पोलिसांनी तपास करुन टेम्पो चालक रोहित गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने हा गुन्हा आनंद वाल्मिकी, परशुराम माने आणि शाहरुख खान यांच्यासोबत केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असात, लता कांबळे यांच्यसोबत पूर्वी भांडण झाले होते. त्या पोलिसांना आरोपींबाबत माहिती पुरवत असल्याचा संशय होता. त्यामुळे आरोपींनी कांबळे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कट करुन त्यांच्या जाण्या-येण्याच्या मार्गावर पाळत ठेवली.

लता कांबळे यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी आरोपींना एका अल्पवयीन मुलाने मदत केली. पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेतले. आरोपींनी कांबळे यांना टेम्पोची धडक देऊन ठार मारुन अपघाताचा बनाव केला. शाहरुख खान हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, वाकड पोलिसांनी आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर केला. अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी मोक्काअंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत.

फरार शाहरुख खान याच्यावर हिंजवडी, वाकड, खडकी, पिंपरी पोलीस ठाण्यात 15 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर आनंद वाल्मीकी याच्यावर वाकड आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. तसेच परशुराम उर्फ परश्या माने याच्यावर चार गुन्हे दाखल आहे. आरोपी रोहित गायकवाड याच्यावर चतु:श्रृंगी, वाकड, सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडळ -2 बापु बांगर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, पोलीस निरीक्षक गुन्हे विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे रविकिरण नाळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, अनिरुद्ध सावर्डे, नागनाथ सूर्यवंशी, श्रेणी उपनिरीक्षक बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, सहायक फौजदार राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार वंदू गिरे, प्रमोद कदम, स्वप्नील खेतले, संदीप गवारी, अतिश जाधव, दीपक साबळे, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, प्रशांत गिलबिले, कौंतेय खराडे, रामचंद्र तळपे, विनायक घारगे, भास्कर भारती, अजय फल्ले, सौदागर लामतुरे, स्वप्नील लोखंडे, रमेश खेडकर, ज्ञानदेव झेंडे, सागर पंडित यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.