Ujani Dam Backwater Boat Accident | उजनी जलाशय बोट दुर्घटनेतील बेपत्ता 6 पैकी 5 जणांचे मृतदेह सापडले, कुटुंबियांचा आक्रोश

0

पुणे : Ujani Dam Backwater Boat Accident | उजनी धरणाच्या जलाशयात मंगळवारी प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली होती. ही बोट १७ तासानंतर शोधण्यात एनडीआरएफला यश आले होते. मात्र, बेपत्ता ६ प्रवाशांचा शोध सुरू होता. अखेर आज सकाळी ६ पैकी ५ जणांचे मृतदेह तब्बल ४६ तासानंतर नैसर्गिकरित्या पाण्यावर तरंगताना दिसले. हे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याचे काम सुरु असून अद्याप करमाळा आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांचे पूत्र गौरव डोंगरे यांचा मृतदेह अजून सापडलेला नाही.

उजनी धरणाच्या जलाशयात आज पाच जणांचे मृतदेह तरंगताना दिसल्यानंतर मृतांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. प्रवाशांना घेऊन जाणारी ही बोट मंगळवार सायंकाळी बुडाली होती. या घटनेत करमाळा तालुक्यातील कुगाव आणि झरे या गावातील ६ सहा प्रवाशी बेपत्ता झाले होते.

मंगळवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील झरे गावात राहणारे गोकुळ ऊर्फ कृष्णा दत्तात्रय जाधव (वय ३० वर्षे) त्यांची पत्नी कोमल गोकुळ जाधव (वय २५वर्षे ) लहान मुलगा समर्थ गोकुळ जाधव (वय दिड वर्ष), मुलगी वैभवी गोकुळ जाधव (वय ३) हे संपूर्ण कुटुंब तसेच सोलापूर येथे कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे, करमाळा येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांचे पुत्र गौरव धनंजय डोंगरे (वय २४) व बोट चालक अनुराग अवघडे (वय २६) असे सात जण कुगाव वरून कळाशीकडे निघाले असताना बोट नदीपात्रातील ऐतिहासिक इनामदार वाड्याच्या परिसरात आली असताना वादळी वारा आणि वळवाचा तुरळ पाऊस यामुळे बोट उलटली.

बोट उलटल्यानंतर बोटीतून प्रवास करणारे पोलीस अधिकारी राहुल डोंगरे यांनी पोहोत तळाशी येथील काठ गाठला. मात्र, अन्य तीन पुरुष एक महिला व दोन बालके असे सहा जण बेपत्ता झाले होते. या बेपत्ता प्रवाशांचा शोध काल दिवसभर एनडीआरएफचे पथक, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक नागरिक घेत होते. अंधार पडल्यानंतर ही शोध मोहीम थांबवण्यात आली. आज सकाळी बेपत्ता प्रवाशांपैकी पाच जणांचे मृतदेहा पाण्यावर तरंगताना दिसले.

मृतदेह ४६ तासापेक्षा जास्त काळ पाण्यात असल्याने त्यांची लगेच ओळख पटवणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.