Pune Hit And Run Case | पुणे हिट अँड रन प्रकरणात कारवाईला वेग! बार मालक, मॅनेजरसह पाच जणांना अटक

0

पुणे : – Pune Hit And Run Case | पुण्यातील कल्याणी नगर जंक्श या ठिकाणी रविवारी पहाटे नंबर प्लेट नसलेल्या पोर्श कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. यानंतर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर मुलाला गाडी देणाऱ्या वडिलांवर आणि त्याला बार व पबमध्ये दारु देणाऱ्या हॉटेल मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

हिट अँड रन प्रकरणात कारवाईला वेग आला आहे. याप्रकरणी आरोपीचे वडील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याला छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर बारचे मालक, मॅनजर सचिन काटकर याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलाच्या बापावर मुलाला चारचाकी वाहन दिल्याप्रकरणी तसेच मुंढवा येथील कोझी हॉटेलचे प्रल्हाद भुतडा व मॅनेजर सचिन अशोक काटकर आणि ब्लॅक पबचे मॅनेजर संदीप रमेश सांगळे, जयेश सतीश बोनकर यांच्यावर अल्पवयीन मुलांना दारु पुरवल्या प्रकरणी बाल न्याय कायद्याच्या कलम 75 आणि 77 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी दिली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

कायद्यापुढे सर्वजण समान

आम्ही आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी चर्चा होत आहे. पण आम्ही सर्व प्रकारची कलम लावली आहेत. तरी देखील कोणी चर्चा करीत असेल तर समोरासमोर चर्चा करण्यास तयार आहोत, तसेच या प्रकरणी आम्ही कोणालाही सोडणार नाही. कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. आम्ही आरोपी विरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.