SDRF Boat Accident Ahmednagar | शोध मोहिमेच्या पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू

अहमदनगर: SDRF Boat Accident Ahmednagar | इंदापूरमध्ये उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये वादळी वाऱ्यामुळे बोट बुडून सहा जण बेपत्ता झाले होते. वीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर शोध मोहिमेस पाच जणांचे मृतदेह हाती लागले. ही बातमी ताजी असतानाच आता अहमदनगर मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नदीत बुडालेल्या लोकांच्या शोधासाठी चालवण्यात आलेली एसडीआरएफ पथकाची बोट बुडाल्याचा प्रकार समोर आला आहे. या दुर्घटनेत तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले असून अजून तीन जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्या तिघांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

अकोले तालुक्यातील प्रवरा नदीपात्रात दोघांचा शोध घेण्यासाठी हे पथक गेले होते. सुगाव बुद्रुक शिवारात दोन तरुण पोहण्यासाठी गेले होते. त्यात दोघे बुडाले होते. त्यातील एकाचा मृतदेह सापडला तर एकाचा शोध सुरू होता.
सदर तरुणांच्या शोधासाठी आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक धुळ्यातून आले होते. मात्र नदीपात्रात मोठा भवरा व खड्डा असल्याने ही बोट पलटी होऊन या पथकातील पाच आणि एक स्थानिक असे सहा जण बुडाले. यातील पाच जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यातील पंकज पवार सुखरूप आहेत तर दुसरा अशोक पवार अत्यावस्थ असून रुग्णालयात उपचार घेत आहे. तर नामा शिंदे, वैभव वाघ, राहुल पावरा या तीन जवानांचे मृतदेह मिळाले आहेत. पाण्यात बुडालेला स्थानिक गणेश देशमुख – वाकचौरे याचा आणि काल बुडालेला अर्जुन जेडगुले याचा शोध सुरू आहे.