PMC News | रिक्त जागांमुळे महापालिकेच्या उपायुक्तांवर अनेक विभागांचा भार; कामांसाठी येणार्‍या नागरिकांचीही डोकेदुखी वाढली

0

पुणे : PMC News | लोकसभा निवडणुकीमुळे (Pune Lok Sabha Election 2024) महापालिकेत Pune Municipal Corporation (PMC) प्रतिनियुक्तीवर आलेल्या तब्बल पाच उपायुक्तांची बदली झाली. परंतू रिक्तपदावर अधिकारीच न नेमल्याने महापालिकेचे काही विभाग हे गेले काही दिवस अधिकार्‍यांविनाच होते. यावर तात्पुरती उपाययोजना म्हणून सध्याच्या अधिकार्‍यांकडेच या रिक्त विभागांचा पदभार देण्यात आला असून एकच अधिकारी तीन ते सात विभागांचा कार्यभार सांभाळत असल्याचे चित्र महापालिकेत पाहायला मिळत आहे.

 लोकसभा निवडणुकीमुळे येथील तीन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केलेले सचिन इथापे (Sachin Ithape), अजित देशमुख (Ajit Deshmukh), चेतना केरूरे (Chetna Kerure), संतोष वारूळे (Santosh Warule), आशा राउत (Asha Raut) या उपायुक्तांची महापालिकेतून बदली झाली आहे. या अधिकार्‍यांकडील विभागांचा पदभार उर्वरीत कार्यरत अधिकार्‍यांकडे सोपविण्यात आला आहे. यामुळे या अधिकार्‍यांकडील कामाचा बोजा वाढला आहे. आचारसंहिता सुरू असल्याने धोरणात्मक निर्णय घेण्याचे काम नसले तरी दैनंदीन शहर व्यवस्थापनावर त्याचा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

  मालमत्ता व्यवस्थापन, दक्षता आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचा पदभार असलेले अतिरिक्त आयुक्त महेश पाटील (Mahesh Patil) यांच्याकडे माहिती व जनसंपर्क विभाग, सांस्कृतिक विभाग, सोशल मिडीया आणि निवडणूक विभाग अशा तीन अतिरिक्त खात्यांचा पदभार देण्यात आला आहे. मोटार परिवहन विभाग आणि मागासवर्ग विभागाचे उपायुक्त जयंत भोसेकर (Jayant Bhosekar) यांच्याकडे परिमंडळ चारचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि मध्यवर्ती भांडार विभागाचे उपायुक्त गणेश सोनुने (Ganesh Sonune) यांच्याकडे परिमंडळ दोनचा पदभार देण्यात आला आहे. आकाशचिन्ह,अतिक्रमण आणि पर्यावरण विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap) यांच्याकडे मालमत्ता कर विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. भूसंपादन विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील (Pratibha Patil) यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. या अधिकार्‍यांकडे वेगवेगळया विभागांचा पदभार देण्यात आला असून त्या विभागाची कार्यालये देखिल विविध ठीकाणी असल्याने कामानिमित्त येणार्‍या सर्वसामान्य नागरिकांसाठीही चांगलीच डोकेदुखी ठरत आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.