Mumbai Police News | चोरांना पकडायला गेला पोलीस, चोरट्यांनी दिले विषारी इंजेक्शन; पोलिसाची मृत्यूची झुंज अपयशी

0

मुंबई : – Mumbai Police News | मुंबई पोलिसांच्या लोकल आर्मसमधील एका पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. माटुंगा स्थानकाजवळ नशेखोरांनी या पोलीस कॉन्स्टेबलवर प्राणघातक हल्ला केला होता. चोरट्यांनी पोलीस कॉन्स्टेबलला विषारी इंजेक्शन दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. ही घटना बुधवारी (दि.1) घडली आहे. विशाल पवार असं या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून ते वरळीत तैनात होते. पोलिसांनी आता या प्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

28 एप्रिलला चोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. चोरांनी त्यांना विषारी लिक्वीडचं इंजेक्शन दिलं त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. विशाल पवार यांच्यावर तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. पोलीस उपायुक्त मनोज पाटील म्हणाले की, उपचारावेळी पवार यांची प्रकृती बिघडली आणि बुधवारी त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल पवार नेहमीप्रमाणे रविवारी रात्री सिव्हील कपड्यात कामावर जात होते. त्यावेळी ते लोकलमधून प्रवास करत होते. सायन ते माटुंगा स्थानकादरम्यान ते लोकलच्या दरवाजात उभे राहून फोनवर बोलत होते. रात्री साडेनऊ वाजता लोकल स्लो झाली तेव्हा प्लॅटफॉर्मवर उभा असलेल्या एका व्यक्तीने विशाल पवार यांच्या हातावर मारलं. तो त्यांचा मोबाईल घेऊन पळून जाऊ लागला.

मोबाईल चोराला पकडण्यासाठी विशाल पवार यांनी ट्रेनमधून उडी मारली. त्यांनी मोबाईल चोराचा पाठलाग सुरु केला. मात्र, पुढे दबा धरुन बसलेल्या चोरांनी आणि नशेखोरांनी विशाल पवार यांना घेरलं. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या नशेखोरांनी पवार यांना पकडून त्यांच्या पाठीत विषारी इंजेक्शन टोचले. तसेच त्यांच्या तोंडात लाल रंगाचे लिक्वीड ओतले. यामुळे विशाल पवार बेशुद्ध पडले.

विशाल पवार यांना 12 तासांनी शुद्ध आली. मात्र, घरी गेल्यानंतर विशाल पाटील यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात. विशाल पवार तीन दिवस उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान बुधवारी त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी कोपरी पोलिसांनी विशाल पवार यांचा जबाब घेतला होता. त्यानुसार दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणाचा पुढील तपास दादर जीआरपीकडे वर्ग करण्यात आला आहे. दादर जीआरपी आयपीसी 302 अंतर्गत या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.