Pune News | पुणे शहरास दीर्घ इतिहास आणि परंपरा – ज्येष्ठ उद्योजक नितीन देसाई

0

पुणे : Pune News | पुणे शहरास वैचारिक, सांस्कृतिक आणि पौराणिक इतिहासाची दीर्घ परंपरा लाभली असून पुणे शहर हे सुरूवातीपासून “आनंदी” शहर म्हणून ओळखले जाते, असे मत ज्येष्ठ उद्योजक आणि दि पूना गुजराती केळवणी मंडळाचे  प्रेसिडेंट नितीन देसाई (Nitin Desai) यांनी व्यक्त केले.

हरिभाई व्ही. देसाई कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या माणिक महोत्सवाच्या शुभारंभानिमित्त दि पूना गुजराती केळवणी मंडळ प्रकाशित आणि मंदार लवाटे लिखीत “शतकापूर्वीचे पुणे काल आणि आज” या पुस्तकाचे प्रकाशन देसाई यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयाच्या श्रीमती शांताबेन आर. देसाई सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दि पुना गुजराती केळवणी मंडळाचे चेअरमन राजेश शहा, उपाध्यक्ष जनक शहा, सचिव हेमंत मणियार, सहसचिव दिलीप जगड, प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव, प्रा. गणेश राऊत, पुस्तकाचे लेखक मंदार लवाटे आणि प्रकाशचित्र संग्राहक अजित पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. हा ग्रंथ निर्माण होण्यासाठी प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव आणि सहसचिव दिलीप जगड यांनी पुढाकार घेतला. यावेळी बोलताना नितीन देसाई म्हणाले की, सोन्याच्या फाळाने नांगरली गेलेली आणि जिजाऊ मातेच्या संस्कारात वाढलेल्या शिवाजी महाराजांची ही पुण्यनगरी असून पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती पासून, जोगेश्वरी मंदिरापासून शनिवार वाडा, आगाखान पॅलेस, पर्वती देवस्थान, सारसबाग (तळ्यातला गणपती), लाल महल, शिंदे छत्री असे एक ना अनेक ऐतिहासीक पौराणीक आणि सांस्कृतीक धागेदोरे आपणास पुण्यात आजही आढळून येतात. आज पुणे शहर माहिती तंत्रज्ञानाचे हब म्हणून ओळखले जात असले, तरी पुण्याने आजही त्याची मूळ ओळख आबाधित राखली आहे .

यावेळी बोलताना राजेश शहा म्हणाले की, पुणे शहर हे शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखले जाते. त्याच बरोबर व्यापाऱ्यांसाठी देखील हे शहर आदर्श शहर म्हणून ओळखले जाते. आज पुणे शहराचा विस्तार आणि विकास वेगाने होत असून महाराष्ट्रातील एक प्रगत आणि प्रमुख शहर म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. आरोग्य वर्धक हवा आणि मनमिळाऊ लोकसंस्कृतीमुळे अनेक जाती पथांचे लोक पुण्याशी एकरूप झाले असून येथे सगळे सुख-समाधानाने नांदतात. अशा पुण्याचा शतकांच्या पाऊल खुणा आज पुस्तक रूपाने प्रकाशित होत आहेत, ही एक ऐतिहासिक घटना आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून पुढील पिढी पर्यंत शतकापूर्वीच्या पुण्याचा समृद्ध वारसा छायाचित्रांसह हस्तांतरीत होत आहे. हे पुस्तक केवळ पुस्तक नसून पुण्यासारख्या शहाराच्या ऐतिहासीक, धार्मिक आणि सांस्कृतिक वाटचालीच्या पाऊलखुणांचे अधिकृत दस्ताऐवजीकरण आहे.

यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून महाविद्यालयाच्या ४० वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेतला. प्रा. डॉ. गणेश राऊत यांनी हेरिटेज सेंटर स्थापन करण्यामागची भूमिका स्पष्ट करून “शतकापूर्वीचे पुणे काल आणि आज” या पुस्तकाच्या अंतरंगावर प्रकाश टाकला. यावेळी पुस्तकाचे लेखक मंदार लवाटे यांचा सत्कार उपाध्यक्ष जनक शहा यांच्या हस्ते करण्यात आला. या पुस्तकासाठी प्रकाशचित्रे उपलब्ध करून दिल्याबद्दल अजित पाठक यांचा यांचा सत्कार सचिव हेमंत मणियार यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतीक घोलप यांनी केले, तर प्रा. ज्योती मालुसरे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.