Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : नाशिक ‘प्रेस’च्या बाद नोटा देण्याच्या बहाण्याने दिल्या चिल्ड्रेन बँकेच्या नोटा, 10 लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

0

पिंपरी : – Pimpri Cheating Fraud Case | चलनी नोटांच्या बदल्यात तीन पट किमतीच्या नाशिक येथील ‘करन्सी नोट प्रेस’मध्ये बाद झालेल्या नोटा मिळवून देतो असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर हॉटेल व्यावसायिकाकडून दहा लाख रुपये घेऊन त्याल 30 लाख रुपयांच्या प्रेस मधील नोटा देण्याचा बहाणा केला. परंतु, त्या चलनी नोटा नसून चिल्ड्रेन बँकेच्या नोटा असल्याचे समोर आले. याप्रकरणी निगडी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. हा प्रकार 30 नोव्हेबर 2023 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ट्रान्सपोर्ट नगर येथे घडला. (Pune Pimpri Chinchwad Crime)

आकाश सत्यवान शेटे (वय-30 रा. वडगाव काशिंबे, ता. आंबेगाव, जि. पुणे), सचिन एकनाथ नरवडे (वय-37, रा. मोशी), अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यासह तुषार टेके आणि दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात आयपीसी 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शुभम भगवान सोनावणे (वय-28, रा. चऱ्होली) यांनी रविवारी (दि.31 मार्च) निगडी पोलिस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा हॉटेल व्यवसाय आहे. तीन वर्षापूर्वी हॉटेलचे बांधकाम सुरु असताना आकाश शेटे याच्यासोबत फिर्यादी यांची ओळख झाली. शेटे आणि त्याच्या साथीदारांनी शुभम यांना पैसे कमावून देण्याबाबत सांगितले. नाशिक येथील कन्सटी नोट प्रेस येथे आपली ओळख असून तेथे छापल्याजाणाऱ्या काही नोटा बाद होतात. मात्र, तरीही त्या चलनात वापरल्या जातात. प्रेसमध्ये बाद झालेल्या नोटा उपलब्ध करुन देणारी व्यक्ती आपल्या ओळखीची आहे, असे शुभमला सांगितले. त्या नोटा सहजपणे चलनात जाऊ शकतात, असे पटवून देत चलनी नोटा छापाईचा एक व्हिडिओ फिर्यादीला दाखवला. तुम्ही दिलेल्या रकमेवर तीन पट जास्तीच्या किमतीच्या नोटा नाशिक येथून आणून देतो, असे शुभम यांना सांगितले.

शुभम यांनी पैसे देण्याची तयारी दर्शवल्यानंतर आरोपींनी ट्रान्सपोर्टनगर येथे दहा लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांना तीस लाख रुपये दिले. पैसे दिल्यानंतर तुम्ही याठिकाणी थांबू नका, असे सांगून आरोपी तेथून निघून गेले. त्यनंतर शुभम यांनी घरी येऊन नोटा तपासल्या असता त्या चिल्ड्रेन बँकेच्या नोटा असल्याचे आढळून आले. शुभम यांनी आकाश मेटेला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फोन बंद लागला. काही दिवसांनी शुभम यांनी संपर्क केला त्यावेळी आकाशने उडवा उडवीची उत्तरे दिली. शुभम यांनी पैशांसाठी तगादा लावला असता आम्ही तुम्हाला खऱ्या नोटा दिल्या होत्या, असा बनाव केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शुभम यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोघांना अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख (API Ambarish Deshmukh) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.