Ajit Pawar On Baramati Lok Sabha | बारामतीत तुमच्या मनातीलच नाव, रायगडमध्ये तटकरे, महायुतीचे उमेदवार ‘या’ तारखेला होणार जाहीर, अजित पवारांची माहिती

26th March 2024

पुणे : Ajit Pawar On Baramati Lok Sabha | रायगडची जागा (Raigad Lok Sabha) आज आम्ही जाहीर केली आहे. रायगडमधून सुनील तटकरे (Sunil Tatkare) निवडणूक लढवतील. शिरुरची (Shirur Lok Sabha) जागा काही वेळात जाहीर करणार आहोत. बारामतीचा थोडा सस्पेन्स राहू देत. काळजी करु नका २८ मार्चला मी काय ठरलंय ते सांगतो. तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव तिथे येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, महायुतीने लोकसभा जागावाटपाचे काम ९९ टक्के पूर्ण केले आहे. मी, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २८ मार्चला संध्याकाळी संयुक्त पत्रकार परिषद घेऊ आणि सगळ्या जागा जाहीर करु.

शिवाजीराव अढळराव पाटील यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. निवडणूक प्रमुख ही जबाबदारी धनंजय मुंडेंवर आम्ही दिली आहे. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मागे रहायाचे नाही ही आमची भूमिका आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.

अजित पवार म्हणाले, जागावाटपाच्या संदर्भात वेगवेगळे अंदाज काही पत्रकारांनी चालवले. आम्हाला तीनच जागा देतील वगैरे सांगितले. मतभेद झाल्याचे सांगितले. मात्र आमच्यात तसे कुठलेही मतभेद नाहीत. आम्ही एकत्र बसून पर्याय काढला. दोन्ही मित्र पक्षांनी सहकार्याची भूमिका घेतली. दरम्यान, विजय शिवतारे यांच्याबद्दल विचारले असता अजित पवार यांनी जास्त काही बोलणे टाळले.