Ajit Pawar NCP On Vijay Shivtare | विजय शिवतारेंची हकालपट्टी करा! टीकेमुळे संतापलेल्या अजित पवार गटाची महायुतीकडे मागणी

0

मुंबई : Ajit Pawar NCP On Vijay Shivtare | शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे नेते आणि अजित पवार यांचे कट्टर विरोधक विजय शिवतारे यांनी आज बारामती लोकसभा मतदार संघातून (Baramati Lok Sabha) सूनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. तसेच उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख देखील जाहीर केली आहे. यानंतर अजित पवार गट आक्रमक झाला असून महायुतीमधून बाहेर पडण्याचा इशारा मित्रपक्षांना दिला आहे. शिवतारे यांच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये (Mahayuti) वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil NCP) यांनी त्याही पुढे जाऊन थेट महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. उमेश पाटील यांनी म्हटले की, आमचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात विजय शिवतारे यांनी अश्लाघ्य टीका केल्यापासून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम्ही करत आहोत.

मात्र आजही त्यांनी अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. आता शिवतारेंची हकालपट्टी करा, एवढीच आमची मागणी आहे. जर निर्णय घेतला गेला नाही, तर आम्हालाही महायुतीमधून बाहेर पडण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला.

उमेश पाटील म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे म्हणणे मांडले. मात्र त्यानंतरही शिवतारे यांच्यावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे महायुतीत राहावे की नाही? याचा आम्ही गंभीरपणे विचार करत आहोत. आता शिवतारे यांचे वर्तन सहन करण्यापलीकडे गेले आहे. आमच्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह टीका आणखी सहन केली जाणार नाही.

शिवतारे यांच्या भूमिकेमुळे राज्यभरातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्र्यांमध्ये दुरावा वाढत चालला आहे. ज्याचा फटका सरतेशेवटी महायुतीच्या मतदानावर होईल. त्यामुळे शिंदे यांनी शिवतारे यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.

दरम्यान, शिवतारे यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी शिवतारे यांना फटकारले आहे. शिरसाट म्हणाले, विजय शिवतारे यांची पक्षाने समजूत काढली आहे. मात्र तरीही ते हट्टाला पेटले असतील तर त्यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा आणि खुशाल निवडणूक लढवावी. जर ते शिवसेनेतून बाहेर पडून निवडणूक लढविणार असतील तर त्यांना आम्ही थांबवू शकत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.