पटत नाही तर उत्तर कोरियात चालते व्हा! राज्यपालांचा नागरिकांना इशारा

North Korea
14th December 2019

शिलाँग : एन पी न्यूज 24 – नागरीकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करणाऱया आंदोलकांना उत्तर कोरियात चालते व्हा, असा इशारावजा सल्ला मेघालयचे राज्यपाल आणि पश्चिम बंगाल भाजपचे पूर्वीचे प्रदेशाध्यक्ष तथागत रॉय यांनी दिला आहे. मोदी सरकारच्या विरोधात बोलणारांना पाकिस्तानात चालते व्हा, अशी धमकी मोदी समर्थक नेहमीच देत असतात. आता तर राज्यपाल या घटनात्मक पदावरील व्यक्तीने नागरिकांनाच असे म्हटल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

लोकशाहीमध्ये विरोधी मतप्रवाह असणारच. ज्यांना ते मान्य नाही, त्यांनी उत्तर कोरियात चालते व्हावे, असे ट्विट राज्यपाल तथागत रॉय यांनी केले आहे. सध्या नागरीकत्व कायद्यावरून ईशान्य भारतात हिंसाचार उसळला आहे. सर्वत्र आंदोलने सुरू असून विद्यार्थीसुद्धा रस्त्यावर उतरले आहेत. शुक्रवारी राजभवनासमोर आंदोलन झाल्याने रॉय यांनी हे ट्विट केले आहे.

उत्तर कोरियात किम जोंग उन ची हुकुमशही आहे. ईशान्य भारतीयांची शारीरिक ठेवण चीनी, जपानी आणि कोरियन धाटणीची असते. शास्त्रीय परीभाषेत यास मंगोलाईड म्हटले जाते. यावरून अन्य भागातील लोक ईशान्य भारतीयांना हिनवत असतात. परंतु, एका घटनात्मक पदावर विराजमान झालेल्या राज्यपालांनी अशाप्रकारचे वक्तव्य केल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

visit : npnews24.com