आईच्या आठवणीत भावूक शरद पवार म्हणाले…

हे तीन दिवस कायम लक्षात राहतात

0

मुंबई : एन पी न्यूज 24 – १२ डिसेंबर याच दिवशी माझ्या आईचा वाढदिवस असतो, त्यामुळे माझ्या वाढदिवसापेक्षा आईचा वाढदिवस म्हणून हा दिवस माझ्या लक्षात राहतो, असे भावूक उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला राज्यातील नेत्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी पवार यांनी कृतज्ञता व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले. आईच्या आठवणीने भावूक झालेले पवार म्हणाले, माझ्या आईने अनेक कष्ट केले. ती शेतात काम करायची, जे पिक येईल ते बाजारात घेऊन जायची. सामाजिक कामाची तिला आवड होती. अतिशय कष्टाने तिने आम्हाला शिकविले, वाढविले. १९३६ साली ती पहिल्यांदा निवडून आली. महिलांच्यावतीने महिलांसाठी काम करता येते हा आदर्श तिने घालून दिला.

मुलींचे शिक्षण, आत्मविश्वासाने मुलींनी पुढे आले पाहिजे, असा त्यांचा आयुष्यभर आग्रह होता. सार्वजनिक जीवनात काम करताना अनेकवेळा यश, सन्मान मिळतो. तर कधी संकटे वाट्याला येतात. या संकटाला सामोरे जाण्याची शक्ती कोणाकडून मिळते याचा विचार मी जेव्हा करतो त्यावेळी दोनजण माझ्यासमोर येतात, एक माझी आई आणि दुसरी महाराष्ट्राची जनता.

याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले, सत्तेत असताना अनेक धोरणे राबविता येतात. ज्या माणसांसाठी आपण योजना आणतो. त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचत आहेत की नाही याचे वास्तव सत्तेतून दूर गेल्यानंतर कळते. आपली बांधिलकी समाजाशी आहे, तरुण पिढीशी आहे. यांना जोडून घेण्यासाठी काम करा, असे पवार म्हणाले.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.