भारत निवडणूक आयोगाने घेतला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा

दिव्यांगासाठी व्यवस्था करणार  - डॉ. दीपक म्हैसेकर

0

एन पी न्यूज 24 – पुणे दि. 5: महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांशी भारत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून कामाचा आढावा घेतला.

 मुंबई मुख्यालयातून घेतलेल्या आढाव्याच्यावेळी भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त उमेश सिंन्हा, उपनिवडणूक आयुक्त सर्वश्री. संदीप सक्सेना, चंद्रभूषण कुमार, महासंचालक (संदेशवाहन आणि समन्वयक) धिरेंद्र ओझा, दिलीप शर्मा व महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह उपस्थित होते.

 त्यांनी पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांबरोबरच विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली तयारी व येत असलेल्या अडचणीबाबत त्यांची मते जाणून घेतली.

 ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना विनासायास मतदान करता यावे, यासाठी तळमजल्यावर मतदान केंद्र निर्माण करावे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याभागातली स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्था व प्रतिष्ठित व्यक्तींशी चर्चा करावी. त्यांना विश्वासात घ्यावे, असे निर्देश श्री. उमेश सिन्हा यांनी दिले. मतदानासाठी आल्यानंतर त्यांना आनंद वाटेल व समाधानाने परत जातील, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना अडचणीचे वाटणारे मतदान केंद्र बदलून घ्यावे. हे काम आव्हान म्हणून स्वीकारावे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. तसेच कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी विभागातील कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती दिली.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर माहिती देताना म्हणाले, विभागातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे मतदान केंद्राचे नुकसान झाले. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. तसेच पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील मतदान केंद्र तळमजल्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. आमच्यासाठी ते आव्हान असले तरी अशक्य नाही. दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणार नाही, यादृष्टीने प्रयत्न केले जातील. संवेदनशील मतदान केंद्रावर लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे येथील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याबरोबरच पोलीस आयुक्त व्यंकटेशम, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, उपायुक्त संजयसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.