Dombivli MIDC Blast | डोंबिवली स्फोटातील मृतांची संख्या वाढली, अजूनही सापडत आहेत मानवी अवशेष, आकडा आणखी वाढण्याची शक्यता

0

डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.

कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.

शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.

अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.