Pune Lok Sabha Election 2024 | मतदानाच्या अनुषंगाने दिशाभूल करणारे संदेश पाठविल्यास कडक कारवाई

0

पुणे : Pune Lok Sabha Election 2024 | मतदारांच्या मतदार यादीतील नावावर डीलीट असा शिक्का मारला असल्यास करावयाच्या कार्यवाहीची चुकीची माहितीबाबतचा संदेश व्हॉट्सअपद्वारे (WhatsApp Message) प्रसारीत केल्याबद्दल एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्यादृष्टीने प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिली आहे. असे चुकीचे संदेश, अफवा पसरविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्र.१७ चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचा दिशाभूल करणारा संदेश संबंधित व्यक्तीने व्हॉट्सअपद्वारे पसरविला आहे. अशा संदेशामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून नागरिक व प्रशासन अशा दोघांना विनाकारण त्रासाला सामारे जावे लागत आहे. या संदेशामुळे हडपसर येथील मतदार नोंदणी कार्यालयात नागरिकांनी चौकशीसाठी गर्दी केली होती. म्हणूनच प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. असे संदेश जिल्ह्यात पसरविले जात असल्याचे निदर्शनास आले असून अशा दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध रहावे, अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार नोंदणीबाबत विशेष संक्षिप्त मोहीम २०२४ अंतर्गत मतदार नोंदणी, वगळणी व दुरुस्तीबाबत सर्व विधानसभा मतदार संघात गेली वर्षभर काम करण्यात आले असून त्यानुसार मतदार याद्या अद्ययावत करण्यात आल्या आहेत. मतदाराचे नाव वगळणी करताना नियमानुसार सर्व कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप संदेशाद्वारे प्रसारीत केलेली माहिती अत्यंत चुकीची आहे, असे स्पष्ट करुन संबंधित व्यक्तीला याबाबत खुलासा २४ तासात सादर करण्याचे आदेश संबंधित व्यक्तीला जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आले आहेत. खुलासा प्राप्त न झाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मतदार यादीत नाव नसेल संबंधितास मतदान करता येणार नाही. मतदार यादीत नाव असल्यास मतदार ओळखपत्र किंवा भारत निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या १२ पुराव्यापैकी एक दाखवून मतदान करता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.