Narendra Dabholkar Murder Case | 11 वर्षांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल; अंदुरे, कळसकरला जन्मठेप, तर 3 आरोपी निर्दोष

0

पुणे : – Narendra Dabholkar Murder Case | अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा तब्बल 11 वर्षांनी निकाल लागला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात यावर सुनावणी सुरु होती. ती आता पूर्ण झाल्याने आज (शुक्रवार दि. 10 मे) या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या निकालानुसार वीरेंद्र तावडेला निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. तर सचिन प्रकाशराव अंदूरे आणि शरद भाऊसाहेब कळसकर यांना जन्मठेप व पाच लाख दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने म्हटले, कोणाचाही खून होणे ही दुर्दैवी घटना आहे. साक्षीदाराची उलट तपासणी घेताना आरोपीच्या वकिलांकडून खूनाचा समर्थन करण्याची वक्तव्य करण्यात आली. ती दुर्दैवी आहेत. त्यावर त्यांनी विचार करावा असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉक करत असताना ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकर यांची दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळ्या झाडत हत्या केली होती. या हत्येनंतर, 15 सप्टेंबर 2021 रोजी पुण्यातील विशेष न्यायालयात हा खटला सुरु झाला होता. त्यानंतर तब्बल 11 वर्षांनंतर या प्रकरणात न्यायालयाने महत्वाचा निर्णय देत आरोपींना शिक्षा सुनावली आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलं होतं.

दाभोलकरांच्या खुनानंतर तब्बल आठ वर्षांनी हा खून खटला सुरु होण्यास मुहूर्त लागला. खुनाचा तपास पूर्ण होऊन पुण्यातील विशेष न्यायालयाने 5 आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आणि खटल्यास सुरुवात झाली. जवळपास अडीच वर्षापासून हा खटला चालू होता. सुरुवातीच्या काळात पुणे पोलीस याचा तपास करत होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपवण्यात आला.

पाच जणांवर खटला दाखल

15 सप्टेंबर 2021 रोजी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चित करण्यात आले. तावडे, अंदुरे, कळसकर आणि भावे यांच्यावर आयपीसी 302 (हत्या), 120(बी) (गुन्ह्याचा कट चरणे), 34 नुसार आणि आर्म अॅक्ट कलमांतर्गत आणि युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यातील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे दोन आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत.

दरम्यान, सुरुवातील या खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस.आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरु होती. त्यानंतर नावंदर यांची बदली झाल्याने सध्या पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु होती. सीबीआय चे वकील प्रकाश सुर्यवंशी यांनी या प्रकरणात 20 साक्षीदार तपासले. बचाव पक्षाचे वकील प्रकाश साळसिंगीकर, वीरेंद्र इचलकरंजीकर आणि सुवर्णा आव्हाड यांनी काम पाहिले. त्यांनी 2 साक्षीदार न्यायालयात उभे केले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला घटनाक्रम

  • 20 ऑगस्ट 2013 – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर याची हत्या
  • पुणे पोलिसांकडून चौकशीला सुरुवात
  • मे 2014 – पुणे पोलिसांकडून सीबीआय कडे तपास वर्ग
  • जून 2016- सीबीआय कडून दोन वर्षांनी पहिला आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडेला पनवेलमधून अटक
  • सप्टेंबर 2016 – डॉ. तावडेवर हत्या आणि हत्येचं षडयंत्र रचल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल
  • ऑगस्ट 2016 – महाराष्ट्र एटीएसकडून वैभव राऊत आणि शरद कळसकर याला अटक
  • मे 2019 – व्यावसायाने वकील असलेल्या संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला सीबीआय कडून अटक, पुनाळेकर आणि भावेची न्यायालयाकडून जामिनावर मुक्तता
  • सप्टेंबर 2019 – दाभोलकर हत्याप्रकरणात आरोपी म्हणून दाखविलेल्या नातन संस्थेशी संबंधित सारंग आकोलकर आणि विनय पवार यांची नावे दोषारोपपत्रातून वगळली
  • सप्टेंबर 2021- पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने दाभोलकर हत्या प्रकरणी अटक केलेले डॉ. तावडे, सचिन अंदुरे, शरद काळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या विरोधात दोषारोपपत्र निश्चित केले.
  • 8 वर्षांनी 2021 मध्ये सीबीआयने अटक केलेल्या आरोपीविरोधात खटला सुरु केला.
Leave A Reply

Your email address will not be published.