Gondia District Court | पेट्रोल टाकून सासरा, पत्नी व 4 वर्षाच्या मुलाचा खून करणाऱ्या आरोपीला फाशी, गोंदिया जिल्हा न्यायालयाचा निकाल

0

गोंदिया : – Gondia District Court | पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसह मुलगा व सासऱ्याला पेट्रोल टाकून क्रुरपणे जिवंत जाळणाऱ्या आरोपीला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश -1, सत्र न्यायालय, गोंदिया यांनी दोषी ठरवत फाशी आणि जन्मठेप व 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. किशोर श्रीराम शेंडे (वय-30 रा. भिवापूर ता. तिरोडा जिल्हा गोंदिया) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना 14 फेब्रुवारी 2023 रोजी गोंदिया येथील सूर्याटोल भागात मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती.

किशोर शेंडे याने पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेवून तिच्याशी भांडण करून तुला जिवानिशी ठार मारून टाकीन अशी धमकी दिली. जीवे ठार मारण्याचे उददेश्याने आरोपीने आपले सोबत पेट्रोल आणून घराचे पडवित झोपलेले सासरे देवानंद सितकू मेश्राम (वय ५२) यांच्या अंगावर व घरावर पेट्रोल टाकले. दाराची कडी वाजवून आरोपीची पत्नी आरती शेंडे ही कोण आहे म्हणून दार उघडण्यास गेली असता आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून माचीस ची जळती काडी टाकून घर जाळले. यात आरोपीचे सासरे यांना पक्षाघात असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर आरोपीची पत्नी व लहान मुलगा जय (वय ४) हे ९० टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरूध्द आयपीसी ३०२, ३०७, ४३६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे आरोपीला १६ मे २०२३ रोजी अटक करण्यात आली होती.

या प्रकरणात वरीष्ठांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे गुन्हयाचा तपास करण्यात आला. गुन्हयात आरोपी विरूध्द सबळ साक्ष पुरावे, परीस्थितीजन्य पुरावे, गोळा करून न्यायालयात आरोपीविरूध्द दोषारोपपत्र सादर करण्यात आले. न्यायालयात हे प्रकरण विशेष खटला केस म्हणून चालविण्यात आली. गुन्हयातील आरोपीने आपल्या पत्नी, सासरे, व लहान चिमुकल्या बाळाला पेट्रोल टाकून अत्यंत क्रूरपणे जाळल्याने या प्रकरणात न्यायालयात शासनाकडून विशेष सरकारी अभियोक्ता यांची नियुक्त करून सदर प्रकरणाची खंबीरपणे बाजू मांडण्यात आली. न्यायालयात आरोपी विरूध्द केलेला युक्तीवाद, सबळ साक्ष पुरावे, हस्तगत मुद्येमाल, प्राप्त सी.सी.टी.व्ही फुटेज, परिस्थितीजन्य पुरावे, यावरून दोषसिद्धी झाली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश -१, न्यायालय गोंदिया यांनी आरोपी किशोर यांला कलम ३०२ मध्ये मरेपर्यंत फाशी ची व १० हजार रूपये दंडाची शिक्षा, कलम ४३६ मध्ये जन्मठेप व १० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

वरीष्ठांचे मार्गदर्शनात या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी केला. तपासात मदत म्हणून सहायक पोलीस निरीक्षक राजु बस्तवाडे यांनी मदत केली. गुन्हयाचे सुरवातीपासून पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांनी गुन्हयाचे गांभीर्य पाहुन स्वतः गुन्हयाच्या तपास कामकाजात लक्ष देऊन न्यायालयात आरोपीस शिक्षा होण्याकरिता गुन्ह्यात संपूर्ण कागदोपत्री पुरावा गोळा करणे, सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकीलाची नेमणुक करणे, न्यायालयात सरकार पक्षातर्फे साक्षदारांची बाजू मांडण्याकरीता नियुक्त विषेश सरकारी वकीलास सहाय्य करण्याचे कामकाज केले.

न्यायालयात सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता विजय कोल्हे यांनी आरोपीस फाशीचे शिक्षेपर्यंत पोहचविण्याकरीता खंबीरपणे बाजू मांडली. अॅड. वेदान्त पांडे, यांनी सहकार्य केले. पोलीस हवालदार देवीनंदन काशीकर, प्रकाश गायधने यांनी गुन्हयात साक्षपुरावे गोळा करणे ते संपुर्ण तपास कामकाज कागदोपत्री पुरावा गोळा करणेपासून कामकाज पाहीले. तसेच न्यायालयात गुन्ह्याचे पैरवी कामकाज म्हणून महिला पोलीस हवालदार नमिता लांजेवार यांनी कामकाज पाहिले. त्याचप्रमाणे गुन्ह्याच्या तपास कामकाज दरम्यान वैद्यकीय मदत म्हणुन डॉक्टर मनू शर्मा, डॉ. मोनल अग्रवाल, वैद्यकिय अधिकारी के. टी. एस. रुग्णालय गोंदिया यांनी सहकार्य केले आहे

पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक नित्यांनद झा यांनी या गुन्हयाचे उत्कृष्ठ तपास कामकाज करणारे, तपास कामात, न्यायालयीन प्रक्रियेत सहाय्य करणारे आरोपीस फाशीपर्यत पोहचविण्याकरीता विशेष प्रयत्न करणारे सर्वांचे विशेष कौतूक व अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.