Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : गाडीला कट मारल्याचा जाब विचारल्याने तरुणाला चाकूने भोसकले, एकाला अटक

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | दुचाकीवरुन घरी जाणाऱ्या तरुणाने गाडीला कट का मारला अशी विचारणा कार चालकाला केली. याचा राग आल्याने कार चालकाने तरुणाच्या पोटात चाकू भोसकून (Stabbing Case) जखमी केले. हा प्रकार बावधन येथील सिद्धार्थ नगर येथे मंगळवारी (दि.7) रात्री अकराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police) एकाला अटक केली आहे.

मोहन भागवत काळे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत यश अनिल शिंदे (वय-23 रा. बावधन ब्रु., पुणे) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सर्वेश दिलीप दिवार (वय-40 रा. शास्त्री नगर, कोथरुड) याच्यावर आयपीसी 326, 506 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यश शिंदे व त्याचा मित्र मोहन काळे व इतर दोन मित्र हे दुचाकीवरुन घरी जात होते. त्यावेळी फिर्यादी यांच्या मित्राच्या गाडीला स्वीफ्ट कारने कट मारला. याबाबत मोहन काळे याने आरोपी सर्वेश दिवार याला तु कारला इंडीकेटर न लावता, माझ्या मित्राच्या गाडीला कट का मारला, अशी विचारणा केली. याचा राग आल्याने आरोपी दिवार याने त्याच्याजवळ असलेला धारदार चाकू बाहेर काढून मोहन याच्या पोटात भोसकून जखमी केले. यश शिंदे आरोपीला पकडत असताना त्याने यशला चाकू दाखवून मारून टाकण्याची धमकी दिली. पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.