Nashik ACB Trap | दीड लाखांची लाच घेताना पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस गर्गे, आरती आळे अँटी करप्शनच्या जाळ्यात

0

नाशिक : – Nashik ACB Trap | राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस मदन गर्गे (Tejas Madan Garge) व नाशिक येथील पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक आरती मृणाल आळे (Aarti Mrinal Aale) यांना दीड लाख रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. तेजस गर्गे यांनी लाचेच्या रकमेतून हिस्सा घेण्यास संमती दर्शवली असल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Bribe Case)

पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, नाशिक सहायक संचालक आरती मृणाल आळे , (वय – 41 रा. फ्लॅट नंबर 17, ए विंग,अनमोल नयनतारा, रानेनगर, नाशिक) संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई तेजस मदन गर्गे (रा. इमारत क्र. 6 फ्लॅट नं. 20, लाला कॉलेज जवळ, महालक्ष्मी रेसकोर्सजवळ, मुंबई) यांच्यावर नाशिक शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indira Nagar Police Station Nashik) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत नाशिक येथील 32 वर्षीय व्यक्तीने नाशिक एसीबीकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार यांना कारखाना सुरु करण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाच्या नाशिक सहाय्यक संचालक कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र हवं होतं. त्यांनी सरकार वाड्यातील प्राचीन वस्तूत कार्यरत असलेल्या सहाय्यक संचालक आरती आळे यांच्याकडे याबाबत अर्ज केला होता. ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याच्या बदल्यात आरती आळे यांनी दीड लाख रुपये लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली.

यानंतर एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता तडजोडी अंती एवढीच लाचेची रक्कम स्वीकारली असता आरती आळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर आरती आळे यांनी तेजस गर्गे, संचालक, पर्यटन व सांस्कृतिक संचलानालय विभाग, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांना लाच स्वीकारल्याचे सांगून त्यांच्या हिश्याचे पैसे कोणाकडे देऊ याबाबत कळविले. गर्गे यांनी लाचेची त्यांच्या हिश्याची रक्कम स्वीकारण्याची संमती दर्शवल्याने त्यांच्यावर इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रसूती रजेवर असताना घेतली लाच

आरती आळे या प्रसूती रजेवर होत्या तेव्हाच त्यांनी लाच स्वीकारली आहे. नाशिकच्या राणे नगर या ठिकाणी असलेल्या नयनतारा गृहप्रकल्पातील फ्लॅट क्रमांक 17 मध्ये त्यांनी दीड लाख रुपये स्वीकारले. यानंतर राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांना हिस्सा बाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी संमती दर्शवली त्यामुळे तेजस गर्गेंवरही गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तेजस गर्गे फरार झाले असून पोलिसांचे एक पथक आणि मुंबई एसीबी विभागाचे अधिकारी त्यांचा शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन. बी. सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक सुवर्णा हांडोरे, पोलीस अंमलदार सचिन गोसावी, अविनाश पवार यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.