Nashik Lok Sabha Constituency | धास्तावलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानासमोर ठिय्या, ”साहेब नाशिकची जागा वाचवा…”

0

नाशिक : Nashik Lok Sabha Constituency | महायुतीमधील (Mahayuti) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (Ajit Pawar NCP) आणि भाजपाने शिंदे गटाच्या (Shivsena Eknath Shinde) अनेक जागांवर दावा करण्यास सुरूवात केल्याने कार्यकर्ते धास्तावले आहेत. मित्रपक्षांनी काही उमेदवार सुद्धा जाहीर केले आहेत. यामुळे शिंदे गटाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी धास्तावले आहेत. नाशिकमध्ये देखील असाच प्रकार सुरू असल्याने ही जागा वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी थेट ठाणे गाठले आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या देत शक्तिप्रदर्शन केले.

भाजप आणि राष्ट्रवादीच्या दाव्यामुळे वादात सापडलेल्या नाशिक लोकसभेच्या जागेवर शक्य तितक्या लवकर उमेदवार जाहीर करा, असे साकडे शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले.

शिंदे गटाच्या ताब्यातील हा मतदारसंघ खेचून घेण्यासाठी भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट प्रयत्न करत आहेत. त्यातच महायुतीत मनसेही येणार असल्याने कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे.

ज्याचा विद्यमान खासदार त्या मित्रपक्षाला जागा सोडायची, यावर महायुतीच्या राज्यस्तरीय नेत्यांमध्ये एकमत आहे. मात्र, शिंदे गटाला या निकषानुसार अनेक ठिकाणी अद्याप उमेदवार जाहीर करता आलेला नाहीत. नाशिकमध्ये सुद्धा तेच घडत आहे. शिंदे गटाची हक्काची जागा असून या जागेसाठी भाजपा आणि राष्ट्रवादी दावा करत आहेत.

मुख्यमंत्र्यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. पण, भाजप नेत्यांनी ती हाणून पाडली. गोडसे यांनी युतीधर्म पाळला नाही, असा आरोप भाजपाने केला.

तर दुसरीकडे छगन भुजबळ हे सुद्धा नाशिक मतदारसंघ घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नाशिक हा कधीकाळी मनसेचा सुद्धा बालेकिल्ला होता, त्यामुळे मनसेसुद्धा येथे दावा करू शकते. या शक्यतेमुळे धास्तावलेल्या नाशिकच्या कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या देऊन ही जागा वाचवण्यासाठी साकडे घातले.

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, खासदार गोडसे आदींच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी ठाण्यात हे शक्ती प्रदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.