Baba Maharaj Satarkar Passed Away | ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन

Baba Maharaj Satarkar

मुंबई : Baba Maharaj Satarkar Passed Away | ज्येष्ठ कीर्तनकार नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे म्हणजेच बाबामहाराज सातारकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अनोख्या कीर्तन शैलीच्या माध्यमातून त्यांनी अध्यात्म आणि भागवत संप्रदायाचा विचार समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवला. वयाच्या 88 व्या वर्षी बाबामहाराज सातारकर यांनी अखेरचा श्वास घेतला. नवी मुंबईतील नेरुळमध्ये ते वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी तीन वाजता नेरुळच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. उद्या सायंकाळी पाच वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुली ह.भ.प. भगवती महाराज व रासेश्वरी सोनकर व नातवंडे असा परिवार आहे. (Baba Maharaj Satarkar Passed Away)

बाबामहाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. पुढे त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.
वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव आहे. 135 वर्षांची वारकरी संप्रदायाची परंपरा त्यांनीही पुढे सुरु ठेवली. त्यामुळे तीन पिढ्यांपासून मिळालेला कीर्तनाचा व प्रवचनाचा वारसा त्यांनी जपला. 10 वी पर्यंत इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या बाबा महाराजांनी पुढे कीर्तनातून प्रबोधनाची वाट धरली आणि समाजप्रबोधन केले. (Baba Maharaj Satarkar Passed Away)

फेब्रुवारी महिन्यात पत्नीचे निधन

बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रुक्मिणी सातारकर उर्फ माईसाहेब यांचं फेब्रुवारी महिन्यात निधन झाले होते.
त्यांनी 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बाबामहाराज सातारकर यांच्या आध्यात्मिक क्षेत्रातील योगदानात त्यांचा
मोलाचा वाटा होता. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले होते.