Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज – कविता द्विवेदी

0

बारामती : Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा मतदासंघाकरीता मंगळवार ७ मे रोजी मतदान होत असून सर्व घटकातील पात्र मतदारांनी आपली जबाबदारी, कर्तव्य समजून या राष्ट्रीय पर्वामध्ये सहभागी होऊन मतदान करावे; आपल्या परिचयातील सर्व मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी (Kavita Dwivedi) यांनी केले आहे.

श्रीमती द्विवेदी म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघाकरीता होणारी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नि:पक्ष, निर्भय, निकोप आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. प्रशासनाच्यावतीने मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, दिव्यांगासाठी रॅम्प, उन्हाळ्याची स्थिती लक्षात घेता औषधे, पाच पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या मतदान केंद्रावर बैठकव्यवस्था, उन्हाळा लक्षात घेता मंडप उभारणी आदी सुविधेसोबतच इतर तांत्रिक बाबींची पूर्तताही करण्यात आली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ असून यामध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर व खडकवासला या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मतदार यादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्राची माहिती शोधण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच याच संकेतस्थळावर असलेले क्युआर कोड स्कॅन करुन मतदार यादीत आपले नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मतदारांनी मतदान केंद्रामध्ये भ्रमणध्वनी घेऊन जावू नये. येत्या ७ मे रोजी मतदान प्रक्रियेदरम्यान सहकार्य करावे.

मतदारसंघनिहाय मतदार ओळख चिठ्ठीचे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी वाटप करण्यात येत आहे. सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात मतदार मदत कक्ष सुरु करण्यात आले आहे तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयनिहाय मतदान केंद्राविषयी विषयी माहिती देणारे क्युआर कोड तयार करण्यात आले आहे. सदरचे क्युआर कोड गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये चिकटविण्यात येणार आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता गृहनिर्माण सोसायट्यांचे अध्यक्ष आणि सदस्य सचिवांनी मतदारांना प्रोत्साहित करुन सहकार्य करावे, असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती द्विवेदी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.