लिंगायत समन्वय समितीचा उद्या पुण्यात महामोर्चा

पुणे : एनपी न्यूज 24 – लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी तसेच अल्पसंख्यांक दर्जा मिळावा यासाठी उद्या पुण्यातील लिंगायत समन्वय समितीने महामोर्चाचे आयोजन केले आहे. यासाठी देशभरातून लिंगायत कार्यकर्ते येणार असून तेलंगणा, कर्नाटक तसेच पुणे आणि राज्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक जमा होणार आहेत.
या मोर्चात डॉ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर, जगद्गुरू परमपूज्य बसवानंद महास्वामी तसेच समितीचे राष्ट्रीय समन्वयक अविनाश भोसीकर यांच्यासह राज्यातील अनेक नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चाचे स्वागताध्यक्ष रमेश कोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते देखील सहभागी होणार आहेत. लिंगायत समाजाला धर्माची मान्यता देण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार असून यामध्ये हि संघटना मागील अनेक वर्षांपासून विविध राज्यांमध्ये आंदोलन करत आहे. नांदेड, लातूर ,सोलापूर सांगली, कोल्हापूर आणि औरंगाबाद या ठिकाणी झालेल्या मोर्च्यात लाखोंच्या संख्येने समाजातील नागरिकांनी सहभाग घेतला होता. मात्र तरीदेखील शासन आमच्या मागण्यांना गांभीर्याने घेत नसल्याने या विराट मोर्चाचे आयोजन केल्याचे आयोजकांनी सांगितले. अनेक निवेदने देऊन देखील सरकारला जाग येत नसल्याने या महामोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान, सर्व पुणे आणि पुणे परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांनी या विराट महामोर्च्यात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी सर्व नागरिकांनी यासाठी बसवेश्वर पुतळा बाजीराव रोड येथे जमावे असे आवाहन करण्यात आले आहे.