ऋषितुल्य गुरुजनांप्रती समाजाने आदर व्यक्त करावा

ज्येष्ठ बासरीवादक केशवराव गिंडे

0

एनपी न्युज 24 पुणे :  कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्‍वामित्र, गौतम, जमदग्नी व वसिष्ठ या ऋषी सप्तश्रींनी ज्ञानाचे घडे भरून ठेवले आहेत. तसेच कार्य आजच्या विज्ञान युगात वैज्ञानिक आणि संशोधक करीत आहेत. अशा विविध क्षेत्रांतील ऋषितुल्य गुरुजनांप्रती समाजाने आदर व्यक्त केला पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ बासरीवादक केशवराव गिंडे यांनी केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत श्री. गिंडे, लोकशाहीर दादा पासलकर, मृदुंगवादक पांडुरंग दातार, साहित्यिक दीपक चैतन्य यांचे ऋषिपंचमीनिमित्त पूजन करण्यात आले. शाला समितीचे अध्यक्ष अशोक पलांडे कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी होते. सोसायटीचे संचालक मिलिंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. पासलकर म्हणाले, ‘कोणत्याही सेवेचे मोल कमी किंवा अधिक नसते. कमकुवत मनामुळे सेवेची प्रतिष्ठा किंवा महत्त्व लक्षात येत नाही. सेवेला प्रतिष्ठा असते. ती मनोभावे केली पाहिजे.’

श्री. चैतन्य म्हणाले, ‘आपण दुसर्‍याला काही देत नाही, तोपर्यंत आपल्याला घेण्याचा अधिकार नसतो. अहंकार सोडल्यास अपेक्षित प्राप्ती व प्रगती होते. बदलत्या काळानुसार होणार्‍या परिवर्तनासाठी सज्ज राहाणे आवश्यक असते.’ मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांनी प्रास्ताविक, राधिका देशपांडे यांनी परिचय, सुहास देशपांडे यांनी सूत्रसंचालन आणि पर्यवेक्षक दिलीप रावडे यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.