‘चौथ्या पवारांचा तीर’ ! पवारांचे कौतुक करत शिवसेनेचा अमित शहा यांना अप्रत्यक्षरित्या टोला

0
मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – सोलापूरच्या महाजनादेश सभेत बोलताना अमित शहा यांनी पवारांवर टीका करत 50 वर्षात त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं असा प्रश्न विचारला होता. त्यावर शिवसेनेने सामनाच्या  अग्रलेखातून भाष्य करत शरद पवारांची पाठराखण केली आहे. तसेच अमित शहांना सडेतोड उत्तर देणाऱ्या शरद पवारांचा नातू  रोहित पवारांचे कौतुक करत बारामतीत नव्या पवारांचा उदय झाल्याचे शिवसेनेने म्हंटले आहे. ‘चौथ्या पवारांचा तीर’ या अग्रलेखातून शिवसेनेने रोहित पवारांचे कौतुक करताना भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.


लेखातील ठळक मुद्दे –

चौथ्या पवारांचा तीर –
पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एका फुटीतून उभा राहिला. त्यामुळे फुटलेलेच पुन्हा फुटले. चौथ्या पवारांनी तीर मारताना आता सांगितले की, घरात आमदारकीपासून खासदारकी आलेली नेते मंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. जाडंभरडं पीठ दुसर्‍या पक्षात गेलं सर्व पडझडीत प्रथमच एका पवारांचा तीर सुटला आहे. अर्थात या तीराने कोणी घायाळ झाले नाही, पण तीर सुटला हे महत्त्वाचे. चौथ्या’ पवाराने भाजपच्या आरोपांना उत्तर दिले असून पवारांचे नातू रोहित पवार यांनी विचारलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत.

 शिवसेनेचा  अप्रत्यक्षरित्या भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना टोला-

भाजपचे अध्यक्ष अमित शहा सध्या सोलापूर दौर्‍यावर आहेत. त्यांनी नेहमीप्रमाणे शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. घराणेशाही, भ्रष्टाचार हा त्यांच्या टीकेचा विषय होता. यावर ‘चौथ्या’ पवारांनी उत्तर दिले आहे. गरज पडली की साहेबांचा म्हणजे शरद पवारांचा सल्ला घ्यायचा. बारामतीत येऊन सोयीनुसार कौतुक करायचे आणि निवडणुकांच्या वेळी साहेबांनी काय केले असे विचारायचे ? कुणीही उठावं आणि बोट दाखवावं असे साहेबांचे राजकारण नाही असेही रोहित पवारांनी ठणकावले आहे.

 डबल ढोलकीचे राजकारण –

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास अभूतपूर्व अशी गळती लागली आहे. ज्यांना पवारांनी वर्षानुवर्षे वतनदार्‍या आणि सुभेदार्‍या दिल्या ते सगळेच ‘उड्या’ मारून ‘गयाराम’ झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणावरील पवारांची मूठ ढिली पडल्याचे हे लक्षण आहे. पवारांनीही त्यांच्या हयातीत मोडतोड तांब्यापितळेचे राजकारण केले व त्यांनी शिवसेनेतूनही काही मासे जाळ्यात ओढले. आज त्यांच्या गोठय़ातील लोक दावण्या तोडून सैरावैरा पळत आहेत. हे सत्य असले तरी महाराष्ट्राच्या जडणघडणीत पवारांचे योगदान आहेच व ते नाकारता येणार नाही. हे योगदान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत येऊन मान्य केले. पवार हे आपल्याला गुरुस्थानी असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी हातचे न राखता अनेकदा सांगितले. त्यामुळे पवारांचे इतक्या वर्षांचे राजकारण, समाजकारणास मोदी यांनी मान्यता दिली. हे इतके झाल्यावर पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ? असा प्रश्न विचारणारे म्हणजे डबल ढोलकीचे राजकारण असल्याचा तीर रोहित पवारांनी मारला.

आमच्याकडे माणसं धुवून घेण्याचे वॉशिंग मशीन नसल्याने माणसं पारखूनच घ्यावी लागतात

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रात आयाराम गयारामांचे पीक जोरात आले आहे. गयाराम कसले ? फक्त आयारामांचाच जोर आहे. रावसाहेब दानवे हे अनेकदा मुद्द्याचे बोलतात. भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात रावसाहेबांनी कोपरखळी मारली. आयारामांची लाट पाहून दानवे म्हणाले, ”बाबांनो, इतकेही घुसू नका की आम्हालाच बाहेर पडावे लागेल.” दानवे म्हणतात ते खरेच आहे. आयारामांची रांग शिवसेनेतही लागली आहे. पण आमच्याकडे माणसं धुवून घेण्याचे वॉशिंग मशीन नसल्याने माणसं पारखूनच घ्यावी लागतात.

Leave A Reply

Your email address will not be published.