Pune News | पुणे शहरात विनापरवानगी अवजड वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करा, शरद पवार गटाची पोलीस आयुक्तांकडे मागणी

0

पुणे : – Pune News | पुणे शहरामध्ये परवानगी नसताना देखील मोठे डंपर राजरोसपणे फिरतात. अवजड वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी गंगाधाम चौकात एका अपघातात एका महिलेला आपला प्राण गमवावा लागला. परवानगी नसताना पुणे शहरात फिरणाऱ्या मोठ्या डंपरवर कारवाई करावी. तसेच आरटीओ, वाहतूक विभाग यांची संयुक्त मोहीम राबवून वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट तपासावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर चिटणीस प्रशांत गांधी यांनी केली आहे. गांधी यांनी याबबत पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिले आहे.

प्रशांत गांधी यांनी निवेदनात म्हटले की, पुणे शहर हे दिवसेंदिवस खूपच वाहतुकीचे शहर होत आहे. यामध्ये आपण जड वाहनांना महानगरपालिका हद्दीमध्ये बंदी केलेली आहे. तरी देखील मोठमोठे डंपर महानगरपालिकेच्या मोठ्या गाड्या तसेच पी एम पी एम एल च्या प्रवासी वाहतूक असणाऱ्या मोठ्या गाड्या या रस्त्याने आपण पाहतो. या सर्व गाड्यांच्या वाहतुकीची तपासणी फिटनेस सर्टिफिकेट हे सर्व व्यवस्थित असले पाहिजे. परंतु, पोलिसांकडून त्याची तपासणी होताना दिसत नाही.

तसेच मोठे डंपर हे राजरोसपणे परवानगी नसताना देखील आपल्याला शहरांमध्ये फिरताना दिसतात. गंगाधाम चौकाजवळ एका दुर्दैवी घटनेमध्ये एका महिलेला आपल्या जीवास मुकावे लागले. असे रोजच पुणे शहरांमध्ये अपघात होताना आपण पाहत आहोत व यामुळे संपूर्ण परिवार उध्वस्त होतात हे आपण पाहत आहात. कृपया आपण स्वतः वाहतूक विभाग व आरटीओ यांची संयुक्तपणे एक महिन्याची मोहीम पुणे शहरात राबवावी व पुणेकरांना या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यास मदत करावी असे निवेदनात नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.